नंदुरबार –
येथील पालिकेच्या स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाचे लोकार्पण व नगरपालिका इमारतीचे भुमिपूजन दि. 15 फेब्रुवारी रोजी राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, अशी माहिती माजी आमदार तथा शिवसेना नेते चंद्रकांत रघुवंशी यांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, शहरातील जी.टी.पी.महाविद्यालयाच्या प्रांगणात ना.ठाकरे यांचा नागरी सत्कार करण्यात येणार आहे.
माजी आ.चंद्रकांत रघुवंशी म्हणाले, नंदुरबार पालिकेने नगरपालिका निवडणुकीत जी आश्वासने दिली होती, ती पूर्णत्वास येत आहेत. पालिकेने दोन वर्षापासून शहरातील संजय टाऊन हॉलशेजारी स्व.बाळासाहेब ठाकरे जलतरण तलावाच्या कामाला सुरुवात केली आहे. हे काम पूर्ण झाले असून त्याचे लोकार्पण राज्याचे मुख्यमंत्री ना.उद्धव ठाकरे यांच्या हस्ते दि. 15 फेब्रुवारी रोजी सकाळी 10.30 वाजता करण्यात येणार आहे.
तसेच 10.45 वाजता शहरातील जुने कोर्टच्या जागेवर नगरपालिकेच्या नुतन इमारतीचे भुमिपूजन ना.ठाकरे यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांचा जाहीर नागरी सत्कार सकाळी 11 वाजता शहरातील जी.टी.पी.महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे उपस्थित राहणार आहेत. विशेष अतिथी म्हणून खा.संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. प्रमुख अतिथी म्हणून कृषि व माजी सैनिक कल्याण मंत्री ना.मंत्री दादा भुसे, धुळयाचे पालकमंत्री अब्दुल सत्तार, आदिवासी विकास मंत्री के.सी.पाडवी, खा.डॉ.हीना गावित, जि.प.अध्यक्षा अॅड.सीमा वळवी, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.सुधीर तांबे, मिलींद नॉर्वेकर, माजी आ.चंद्रकांत रघुवंशी, आ.शिरीषकुमार नाईक, आ.राजेश पाडवी, संपर्कप्रमुख बबनराव थोरात, जिल्हाप्रमुख विक्रांत मोरे, जि.प.उपाध्यक्ष अॅड.राम रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत उपस्थित राहणार आहेत.
कार्यक्रमाला उपस्थितीचे आवाहन माजी आ.रघुवंशी, नगराध्यक्षा सौ.रत्ना रघपुवंशी, उपनगराध्यक्षा सौ.भरती राजपूत, बांधकाम सभापती दीपक दिघे, मुख्याधिकारी बाबुराव बिक्कड यांनी केले आहे. या पत्रकार परिषदेला शिवसेनेचे जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, बांधकाम सभापती दीपक दिघे, माजी नगराध्यक्ष कुणाल वसावे, माजी नगरसेवक अशोक राजपूत व अन्य उपस्थित होते.