मुंबई | Mumbai
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ नेते भैय्याजी जोशी यांनी मराठी (Marathi) भाषेसंदर्भात केलेल्या वक्तव्याचे राज्यभरात पडसाद उमटत आहेत. जोशी (Bhaiyyaji Joshi) यांनी मुंबईत एका कार्यक्रमात बोलतांना ‘घाटकोपरची भाषा गुजराती आहे, तर गिरगाव येथे हिंदी बोलणारे कमी आहेत. तिथे मराठी भाषा बोलणारे लोक आढळतील. मुंबईत येणाऱ्याला मराठी बोलता (Marathi Language) आलंच पाहिजे असं काही नाही”, असे वक्तव्य केले होते. त्यामुळे विरोधकांकडून जोशी यांनी माफी मागावी अन्यथा त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली जात आहे. त्यानंतर आता भैय्याजी जोशी यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे (ठाकरे गट) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी माध्यमांशी बोलतांना तीव्र शब्दात संताप व्यक्त करत ‘भैय्याजी जोशी हा माणूस चिल्लर आहे हे मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं किंवा भैय्याजी जोशींवर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली आहे.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “महायुतीच्या सगळ्या आमदारांना (MLA) छावा चित्रपट दाखवण्यासाठी खास शो आयोजित करण्यात आला होता. ते सगळे लोक छावा बघत असताना या काळातील अनाजीपंत इकडे येऊन मराठी-अमराठी असं विष कालवून गेले आहेत. छत्रपती शिवाजी महाराज, छत्रपती संभाजी महाराज पुन्हा जन्माला येऊ शकत नाहीत. पण महाराष्ट्रात फूट पाडणारे औरंगजेब आणि त्यांना मदत करणारे अनाजीपंत जन्माला आलेत आणि येतात. याशिवाय दुसरं दुर्दैव असू शकत नाही,’ अशा शब्दांत त्यांनी जोशींवर टीका केली.
पुढे ते म्हणाले की, “भैय्याजी जोशींची मातृभाषा कोणती कल्पना नाही. पण त्यांनी येऊन मुंबईत (Mumbai) घाटकोपरला मुंबईत राहणाऱ्याला मराठीत यायलाच पाहिजे असं काही असं विधान केलं. याचा अर्थ असा हा संघाचा, भाजपचा छुपा अजेंडा आहे. यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. हिंदुस्तान-पाकिस्तानचा विषय त्यांनी बरेच दिवसात काढलेला नाही. मात्र, आता त्यांनी ‘मराठी-मराठी’ असा वाद काढलेला आहे. त्यांना मी आव्हान करतो की, अशी गोष्ट कर्नाटकात, तामिळनाडूमध्ये, बंगालमध्ये जाऊन करून दाखवा. दक्षिण भारतात अशी भाषा करून सुखरूप घेऊन दाखवा”, असे थेट आव्हान उद्धव ठाकरेंनी यावेळी जोशींना दिले.
तसेच “काल विधान परिषदेत ज्या प्रकारे मुख्यमंत्री म्हणाले, कोरटकर कोरटकर काय करता, कोरटकर हा चिल्लर माणूस आहे. तसं मुख्यमंत्र्यांनी जाहीर करावं की भैय्याजी भैय्याजी काय करता, भय्याजी हा चिल्लर माणूस आहे. एक तर त्यांनी त्याला चिल्लर जाहीर करावं. नाही तर त्याच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. महाराष्ट्रात मराठी भाषा सक्तीची करण्याचा कायदा महाविकास आघाडीचं सरकार असताना केलेला आहे. या कायद्याच्या विरोधात जाऊन मुंबईत मराठी भाषा आली नाही चालेल असं बोलणाऱ्या एकाविरोधात कायद्याचा बडगा उगारला तर यापुढे असं बोलण्याची कोणाची हिंमत होणार नाही”, असेही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.