औसा । Ausa
काल वणीमध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बॅगा निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी तपासल्या होत्या. याचा व्हिडिओ उद्धव ठाकरेंनी शेअर केल्यामुळे राज्यातील राजकारण तापलं होतं.
यावरून ठाकरे गटाने सत्ताधाऱ्यांच्या बॅगा देखील तपासा असं आव्हान केलं होतं. अशातच आता आज औसामध्ये देखील उद्धव ठाकरेंच्या बॅगांची तपासणी करण्यात आली आहे. त्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
दरम्यान यावेळी उद्धव ठाकरे यांनी अधिकाऱ्यांचीच उलटतपासणी केली. उद्धव ठाकरेंनीही सामानाची तपासणी करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी केली. त्यांचं नाव, त्यांचं नियुक्त पत्रक, एवढंच नव्हे तर त्यांच्या खिशातील पाकिटात किती पैसे आहेत, याचीही विचारणा उद्धव ठाकरेंनी केली. दरम्यान, आतापर्यंत किती जणांना तपासलं आहे, याबाबत विचारलं असता अधिकाऱ्यांनी तुम्हीच पहिले आहात असं म्हटलं.
त्यावर, “मीच पहिला गिऱ्हाईक आहे का?” असा मिश्किल सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यावेळी त्यांनी मोदींच्या बॅगा तपासण्याचंही आव्हान या अधिकाऱ्यांना दिलं. ते म्हणाले, आज मोदी सोलापुरात येत आहेत. ओदिशात त्यांची बॅग तपासली म्हणून अधिकाऱ्यांना सस्पेंड केलं होतं. त्यामुळे माझी तपासणी होत असेल तर मोदींचीही तपासणी झाली पाहिजे, ही माझी जाहीरसभेतील आजची मागणी आहे. मला जो न्याय लागतो, तो मोदींनाही लागला पाहिजे.” बॅग तपासत असताना उद्धव ठाकरे अधिकाऱ्यांना म्हणाले, बॅगा तुमच्याकडेच ठेवा. हवंतर माझ्या पुढच्या मुक्कामी या बॅगा घेऊन या, असंही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांची बार्शी शहरात सायंकाळी ६ वाजता जाहीर सभा होणार आहे. उद्धव ठाकरे यांच्या उद्या धाराशिव जिल्ह्यात दोन प्रचार सभा होणार आहेत. उमरगा विधानसभेचे ठाकरेंचे उमेदवार प्रवीण स्वामी यांच्यासाठी लोहारा येथे एक वाजता तर धाराशिव विधानसभेचे उमेदवार कैलास पाटील यांच्यासाठी धाराशिव शहरात सायंकाळी सात वाजता उद्धव ठाकरे यांची सभा होणार आहे. केज मतदार संघामध्ये नितीन गडकरी यांची सभा होणार आहे सकाळी ११ ते १२ दरम्यान ही सभा सुरू होईल.