मुंबई | Mumbai
दिशा सालियानच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे. या याचिकेमध्ये शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार आदित्य ठाकरे यांच्यावर देखील आरोप करण्यात आला आहे. त्यानंतर आता राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपाला उधाण आले आहे. या प्रकरणात आता शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.
यावेळी बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “अधिवेशन म्हटले की हा विषय येणारच.मला आश्चर्य वाटले गेल्या एक दोन अधिवेशनात हा विषय आला कसा नाही. दरवेळी अधिवेशनात हा मुद्दा काढला जातो. त्यात नवीन काय आहे? पण आदित्य ठाकरे यांच्यावर होत असलेल्या आरोपांमध्ये कोणतेही तथ्य नाही. आमचे घराणे सहा सात पिढ्या जनतेच्या समोर आहे. आमचा या प्रकरणाशी दूरदूरपर्यंत संबंध नाही. ज्यांना न्यायालयात काही पुरावे द्यायचेत त्यांनी ते द्यावेत”, असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
पुढे ते म्हणाले की,”शेतकऱ्याच्या चिता पेटतायेत, त्याला जबाबदार कोण? माताभगिनी टाहो फोडतायेत, त्याला जबाबदार कोण? संतोष देशमुखांच्या न्यायासाठी त्यांची मुलगी बोलतेय, तिला न्याय कोण देणार? असे सवालही उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला विचारले. तसेच जेव्हा ही दंगल घडली त्या दंगलीमध्ये ज्याने महिला पोलिसांचा विनयभंग केला त्याचे हात आधी छाटले पाहिजे. त्यासोबतच जर कोणी दंगल भडकवली असेल तर त्याला सुद्धा कायद्याचा इंगा दाखवला पाहिजे. एकूणच काय हे सत्ताधारी आहेत ते ढिगभर आहेत आणि विरोधी पक्ष फक्त मुठभर आहेत. मुठभर असलेला विरोधी पक्ष ढिगभर असलेल्या सत्ताधाऱ्यांना भारी पडत आहे”, असेही त्यांनी म्हटले.