ठाणे | Thane
शिवसेना ठाकरे गटाचे (Shivsena UBT) मानपाडा परिसरातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर (Pradeep Purnekar) यांची मंगळवारी (दि.२८) रोजी रात्री गोळ्या झाडून आणि धारदार शस्त्राने वार करुन निर्घृण हत्या करण्यात आली होती.या घटनेनंतर ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसह नेते चांगलेच आक्रमक झाले असून, संशयित आरोपींना अटक करण्याची मागणी केली जात आहे. काल (बुधवारी) रात्री शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांनी ठाण्यातील मानपाडा पोलीस ठाण्यात (Police Station) जाऊन पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करावा, अशी मागणी केली होती. यावेळी त्यांनी पूर्णेकर कुटुंबियांना धीर दिला होता.
उद्धव ठाकरेंनी केले पूर्णेकर यांच्या कुटुंबियांचे सांत्वन
आज (गुरुवारी) शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी प्रदीप पूर्णेकर यांच्या ठाण्यातील निवासस्थानी जाऊन प्रदीप पूर्णेकर यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट घेऊन त्यांना धीर दिला. यावेळी आम्ही तुमच्या सोबत आहोत, असे आश्वासन उद्धव ठाकरेंनी पुर्णेकर यांच्या कुटुंबाला दिले. तसेच आता जे काही कराल ते शांत डोक्याने करा, भावनिक होऊन कुठलेही पाऊल उचलू नका, असा सल्लाही त्यांनी पूर्णेकर यांचा मुलगा आणि भावाला दिला.
प्रदीप पूर्णेकरांच्या मुलासोबत साधला संवाद
उद्धव ठाकरेंनी मयत प्रदीप पूर्णेकर यांचा मुलगा राम पुर्णेकर (Ram Purnekar) यांच्यासोबत संवाद साधला.आम्ही पूर्णेकर कुटुंबीयांसोबत आहोत,असे त्यांनी आश्वस्त केले. यावेळी उद्धव ठाकरे यांच्याशी बोलताना प्रदीप पूर्णेकर यांची पत्नी विजेता पूर्णेकर, मुलगा राम पूर्णेकर आणि मुलीसह आदी नातेवाईक भावूक झाले होते. उद्धव ठाकरे यांच्यासोबत आमदार मिलिंद नार्वेकर, माजी खासदार राजन विचारे, मनसेचे नेते अविनाश जाधव हे देखील उपस्थित होते.
प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची सखोल चौकशी करावी
या प्रकरणात लवकरात लवकर गुन्हा दाखल झाली पाहिजे तसेच मिनाक्षी शिंदे यांच्या नावाचाही त्यात उल्लेख असावा. सर्व आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे. या घटनेत लवकरात लवकर आरोपपत्र दाखल करावे.प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येची सखोल चौकशी करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले. तसेच काल संजय राऊत आल्यामुळे एफआयआरमध्ये त्यांचे नाव आले, आधी पोलीस एफआयआरमध्ये नाव घेत नव्हते, असेही त्यांनी म्हटले.
आतापर्यंत चौघे ताब्यात
दरम्यान, प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी ठाणे गुन्हे शाखेने दोन महिला आणि दोन पुरुषांना चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. तसेच दोन दुचाकी देखील ताब्यात घेतल्या आहेत. चौघे फरार आरोपी आणि अटक (Arrested) केलेले आरोपी एकमेकांच्या संपर्कात होते अशी माहिती समोर आली आहे.




