नागपूर | Nagpur
सध्या नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Cabinet Expansion) राज्य सरकारचे (State Government) अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनास आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हजेरी लावली. ते आज विधानपरिषदेच्या कामकाजात देखील सहभागी झाले होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला.
यावेळी बोलतांना ठाकरे म्हणाले की, “लाडक्या बहीण योजनेचे (Ladki Bahin Yojana) पैसे देताना आवडती, नावडती करू नका. तसेच निकष न पाहता १५०० नव्हे तर २१०० रुपये देत मागील सर्व बॅकलॉग भरुन काढा, असे त्यांनी म्हटले. यापूर्वी अडीच वर्ष घटनाबाह्य सरकार होते. निवडणुकीचा निकाल सर्वांनाच अनपेक्षित आहे, त्यामुळे त्यांना ईव्हीएम सरकार म्हटले जाते. ईव्हीएम सरकारचे हे पहिले अधिवेशन आहे. या सरकारला आमच्या शुभेच्छा आहेत. जनता नाईलाजाने त्यांच्याकडून अनेक अपेक्षा करत आहेत. काही गावांमध्ये निकालाविरोधात आंदोलने केली जात आहेत. विजयाचा आनंद कुठेही दिसला नाही. मंत्रिमंडळाच्या विस्तारापेक्षा वजाबाकीची चर्चा अधिक आहे. मंत्रीपद ज्यांना मिळाले त्यांच्या फटाक्यांपेक्षा नाराजांचे बार जास्त मोठ्याने वाजत आहेत”, असेही उद्धव ठाकरेंनी म्हटले.
पुढे भुजबळ यांच्या नाराजीवर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की,”छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांच्याबद्दल फार वाईट वाटते. भुजबळांसह अनेकांबरोबर असे झाले आहे. अनेकांची जॅकेट वाट पाहत होती. त्याविषयी सहानुभूती आहे. लाडका आमदार (MLA) अशी काही योजना आहे का? तसेच सरकारची दैना झाली आहे, यामुळे तिकडं ‘चैना-मैना’ काही होणार नाही. त्यामुळे भुजबळ यांचे ‘वहा नहीं रहेना’ हे योग्य असून ते अधूनमधून माझ्या संपर्कात असतात” असे त्यांनी म्हटले.
तसेच राज्यपालांच्या (Governor) भाषणावर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की,”राज्यपाल यांच्या अभिभाषणावर मी खेद व्यक्त करतो, खेद व्यक्त करण्याचा आम्हाला अधिकार आहे. राज्यपाल यांनी जे भाषण केले त्यात पर्यावरण म्हणून उल्लेख आहे. त्यात ते एक समिती स्थापन करणार आहेत या समितीवर कोण असेल? आज मी बातमी बघितली डोंगरी इथे जे कार शेड आहे. त्यासाठी १४०० झाडे कापण्यात येणार आहेत. तसेच महिलांच्या सुरक्षेबाबत हे सरकार काही करणार आहे का? एक गंमत म्हणून हे अधिवेशन घेत आहेत. मला वाटते मंत्रिमंडळ खातेवाटप लवकर झाले पाहिजे होते. कोणताही मंत्री कोणतेही उत्तर देत आहे, त्यामुळे खातेवाटप जाहीर झाले पाहिजे. मी जनतेच्या सभागृहात प्रश्न मांडले आहेत, आता माझे आमदार विधानसभेत (Vidhansabha) प्रश्न मांडतील” असेही त्यांनी म्हटले.