Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्या‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने फडणवीस अस्वस्थ; ठाकरे गटाकडून घणाघात

‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने फडणवीस अस्वस्थ; ठाकरे गटाकडून घणाघात

मुंबई | Mumbai

“देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते. पण, ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली आणि ते अहंकाराचे महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले आहे.” अशा अत्यंत बोचऱ्या शब्दात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर शिवसेना (UBT) पक्षाचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे.

- Advertisement -

फडणवीस मी पुन्हा येईन, असे म्हणालो होते. बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली तरीही मी आलोच, असे फडणवीस यांनी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा सांगितले आहे. ही त्यांची अर्धग्लानी अवस्था आहे. फडणवीस म्हणतात, ‘‘पहा, मी पुन्हा आलो.’’ हे सत्य नाही. ते अजिबात आलेले नाहीत, तर दिल्लीने त्यांचे राजकीय श्राद्ध घालण्याचा प्रयोग केला. फडणवीस यांच्यासारख्या अनुभवी, कर्तबगार नेत्याला ‘बिनपगारी उपअधिकारी’ करून टाकले. त्यामुळेच महाराष्ट्रात सर्वच बाबतीत व क्षेत्रांत चिंतेची स्थिती निर्माण झाली, अशी जोरदार टीका ठाकरे गटाने केली आहे.

फडणवीस हे भांबावलेल्या मनःस्थितीत असल्याने राज्यातील कायदा-सुव्यवस्थेची स्थिती गंभीर बनली आहे. तरुण मुली व महिलांवर दिवसाढवळय़ा भररस्त्यांवर हल्ले होत आहेत. खुनाखुनी सुरू आहे. त्यावर बोलायचे सोडून गृहमंत्री असलेल्या फडणवीसांनी ‘पुन्हा पुन्हा पुन्हा’चे तुणतुणे वाजवणे सुरू ठेवावे हे योग्य नाही. फडणवीस ‘उप’ म्हणून पुन्हा आले. ते ‘उप’पददेखील संपूर्ण नाही. आता दिल्लीश्वरांनी अजित पवारांनादेखील ‘उप’ करून फडणवीसांची अवस्था बिकट केली. ‘‘मी पुन्हा पुन्हा पुन्हा ‘उप उप उप उप’ म्हणून आलो’’ हे घोषवाक्य अजित पवारांना शोभते. पुन्हा ज्या पवारांना फडणवीस चक्की पिसायला पाठवणार होते, त्यांना बाजूला बसवून ते काय आता सत्यनारायणाची पूजा सांगत आहेत, असा खोचक सवालही त्यांनी विचारला आहे.

देवेंद्र फडणवीस हे आधी एक संवेदनशील व्यक्ती होते, पण ‘उप’ झाल्याच्या वैफल्यात त्यांची संवेदनशीलता संपली व अहंकाराचे ते महामेरू बनले. ‘मुख्य’चा ‘उप’ झाल्याच्या न्यूनगंडाने त्यांना अस्वस्थ केले. त्यामुळे त्यांची मानसिक अवस्था समजून घेणे गरजेचे आहे. अर्धग्लानी अवस्थेत ते अनेकदा असल्याने रामप्रहरीचे सत्य त्यांना समजत नाही व भांग ही दुपारीच उन्हात जास्त चढते हे लक्षण त्यांच्यात दिसते. ‘उप’ची नशा ही देशी बनावटीची आहे. कधीकाळी ‘मुख्य’ असणाऱ्याने आज अशी ‘देशी’ स्वीकारल्याचा परिणाम महाराष्ट्र पाहतोय. एका चांगल्या माणसाच्या त्यामुळे झोकांडय़ा जात आहेत. फडणवीस सांभाळा, असा सल्लाही ठाकरे गटाकडून देण्यात आला आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या