मुंबई | Mumbai
मराठवाड्यात उद्भवलेल्या पूरपरीस्थीतीबाबत माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारकडे मोठी मागणी केली आहे. शेतकर्यांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे आणि नियम तपासण्यात वेळ न घालवता तातडीने आर्थिक मदत बँक खात्यात जमा करण्याची मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. किमान 10,000 कोटींची मदत तात्काळ जाहीर करावी, असेही त्यांनी म्हटले आहे. शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये नुकसानीचे पैसे तात्काळ जमा करावेत. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये, यासाठी निर्देश देण्याची मागणीही त्यांनी केली.
दुष्काळाचे निकष बाजूला ठेवून सढळ हस्ते मदत करा
“पहिल्यांदा भरपाई ही बँक खात्यांमध्ये जमा करा आणि नंतर त्याची शहानिशा करत बसा,” असे त्यांनी म्हटले. जुन्या निकषांप्रमाणे दोन हेक्टरपर्यंत मदत न देता तीन हेक्टरपर्यंत मदत द्यावी, अशी त्यांची मागणी आहे. ओल्या दुष्काळाचे निकष बाजूला ठेवून सढळ हस्ते मदत जाहीर करावी. स्वतःच्या जाहिरातबाजीवरती पैसा उधळविण्याऐवजी आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने मदतीचा हात द्यावा, असेही त्यांनी नमूद केले.
मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता
सध्या मराठवाड्यात सुरू असलेल्या अतिवृष्टीचे वैशिष्ट म्हणजे आजपर्यंत दुष्काळग्रस्त समजल्या जाणाऱ्या बीड, लातूर, धाराशिव, जालना, संभाजीनगर, नांदेड, परभणी अशा जिल्ह्यांमध्ये शेतकऱ्याचे पीक पाण्यात गेले आहे. मराठवाड्यातला शेतकरी बेसावध होता. इतक्या वर्षांपासून कधी ढगफुटी, अतिवृष्टी त्याने पाहिली नव्हती. नाही म्हणायला काही वर्षांपूर्वी धाराशिव भागात एकदा गारपीट झाली होती. पण आता लाखो हेक्टर जमीन खरवडून निघाली आहे आणि खरीप पिकं डोळ्यादेखत पाण्यात गेली असल्याचे उद्धव ठाकरे यांनी म्हटले.
जमीन वाहून गेल्याने रब्बी पिकं धोक्यात आली
जमीन वाहून गेल्याने रब्बी पिकं धोक्यात आली आहे. गुरे ढोरे वाहून गेले, रस्ते वाहून गेलेत. मराठवाड्यात शेतीला जो फटका बसला आहे त्यातून ते कसे सावरणार? केंद्राने किमान तातडीने दहा हजार कोटींची मदत जाहीर करावी शेतकऱ्यांच्या खात्यात तात्काळ नुकसानीचे पैसे जमा करावे. या खात्यांमधून बँकांनी कर्जाच्या हप्त्याची रक्कम वळती करून घेऊ नये, यासाठी तसे निर्देश द्यावे. अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
मंत्री मंत्रालयात बसून ऑनलाईन सल्ले देत आहे
महाविकास आघाडी सरकार सत्तेवर आले त्या काळात दुष्काळ परिस्थिती, अतिवृष्टी , चक्रीवादळ यासारख्या आपत्तीने शेतकरी अक्षरशः रडवेला झाला पण तेव्हा देखील केंद्राने कोणतीही मदत केली नाही. अतिशय तुटपुंजी मदत दिली असल्याची आठवण ठाकरे यांनी करून दिली. शेती AI च्या मदतीने करा असा सल्ला ही सरकार शेतकऱ्यांना देतेय पण अशी नैसर्गिक आपत्ती येऊनही महायुती सरकारचे मंत्री आणि अधिकारी तिकडे मंत्रालयात बसून ऑनलाइन सल्ले देत असल्याचे टीकास्त्र ठाकरे यांनी सोडले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




