मुंबई । Mumbai
गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर एका बाजूला ढोल-ताशांचा गजरात संस्कृती जपण्याचा प्रयत्न सुरू असतानाच, दुसरीकडे महाकाय डीजे-डॉल्बीच्या दणधणाटावरून नव्या राजकीय आणि सामाजिक वादाला तोंड फुटले आहे.
“लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सामाजिक एकतेसाठी सुरू केला, पण आज त्याचे रूपांतर त्रासदायक गोंगाटात होत आहे,” अशी खंत व्यक्त करत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारवर घणाघाती टीका केली. माध्यमांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी डीजे-डॉल्बी बंदीसह सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या पक्षाच्या नाव आणि चिन्हाच्या वादावर अत्यंत महत्त्वपूर्ण व आक्रमक विधान केले आहे.
उत्सवातील वाढत्या ध्वनिप्रदूषणावर तीव्र नाराजी व्यक्त करत उद्धव ठाकरे म्हणाले, “आरती, झांज आणि घंटानादात जो पारंपरिक आनंद आहे, तो महाकाय डीजेच्या गोंगाटात नाही. उत्सव जनतेच्या आनंदासाठी असावेत, त्यांना त्रास देण्यासाठी नव्हे.” पुढे बोलताना त्यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे थेट मागणी केली की, राज्य सरकारने केवळ चर्चांचे गुऱ्हाळ न दळता पोलीस आयुक्तांची बैठक घेऊन संपूर्ण महाराष्ट्रासाठी एकसमान धोरण आखावे. नागपूर, पुणे किंवा पनवेलमध्ये वेगवेगळे नियम का? डेसिबलची मर्यादा ठरलेली असताना त्याची कठोर अंमलबजावणी कोण करणार, असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.
शिवसेना पक्षाचे नाव आणि ‘धनुष्यबाण’ चिन्हासंदर्भात सर्वोच्च न्यायालयात प्रलंबित असलेल्या खटल्यावर बोलताना त्यांनी मोठा दावा केला. ठाकरे म्हणाले, “न्यायालयीन निकालाला कोणत्याही कारणास्तव विलंब लागणार असेल, तर तत्काळ ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह गोठवून टाका, अशी मागणी आम्ही सर्वोच्च न्यायालयात केली आहे.” गद्दारी करून आणि या चिन्हाचा दुरुपयोग करूनच विरोधकांनी सत्ता मिळवली आहे, असा आरोप करत त्यांनी स्पष्ट केले की, “ज्येष्ठ वकील कपिल सिब्बल यांनी चिन्ह कायमचे गोठवावे अशी मागणी केलेली नाही, तर निकाल येईपर्यंत या चिन्हाचा गैरवापर रोखण्यासाठी हा कायदेशीर पर्याय मांडला आहे. आमचा मूळ लढा पक्षाचे नाव आणि चिन्ह परत मिळवण्यासाठीच आहे,” असा पुनरुच्चारही त्यांनी केला.




