मुंबई । Mumbai
मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. रविवारी ४ जानेवारी रोजी दादर येथील ‘शिवसेना भवन’मध्ये शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे), महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचा संयुक्त वचननामा प्रसिद्ध करण्यात आला. “ठाकरेंचा शब्द, मुंबईकरांसाठी शिवशक्तीचा वचननामा” या नावाखाली ८ पानांचा हा जाहीरनामा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्रितपणे प्रकाशित केला.
या नंतर पत्रकारांशी संवाद साधताना उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि महायुती सरकारवर टीकेची झोड उठवली. विशेषतः श्रेयवादाच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंनी पंतप्रधानांना खोचक टोला लगावला. “आम्ही मुंबईसाठी कोस्टल रोड, मध्य वैतरणा प्रकल्प किंवा कोरोना काळातील साधी कामे केली आहेत. आम्ही जे केले तेच होर्डिंगवर लावले आहे. पण आमच्या साध्या कामांचे श्रेय घेण्यापेक्षा पंतप्रधानांनी आपण केलेले मोठे पराक्रम लोकांना सांगावेत. मोदींनी कैलास पर्वत बांधला आणि स्वर्गातून गंगा पृथ्वीवर आणली, हे ते का सांगत नाहीत? असा जहरी टोला त्यांनी लगावला.
लोकशाहीच्या सद्यस्थितीवर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, देशात लोकशाही संपून सध्या झुंडशाही सुरू झाली आहे. मतचोरी पकडल्यावर आता उमेदवारांची पळवापळवी सुरू केली जात आहे. मुंबईतील काही वॉर्डमध्ये निवडणूक बिनविरोध करणे हा मतदारांचा आणि लोकशाहीचा अपमान आहे. तसेच, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे निपक्षपातीपणे वागत नसून ते स्वतःला ‘नायक’ समजत आहेत का? असा प्रश्न विचारत त्यांना तत्काळ निलंबित करण्याची मागणीही त्यांनी केली.
या वचननाम्याद्वारे ठाकरे बंधूंनी मुंबईकरांसाठी अनेक आश्वासने दिली आहेत. यामध्ये ७०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना मालमत्ता कर माफी, १०० युनिट मोफत वीज, घरकाम करणाऱ्या महिलांना आणि कोळी भगिनींना दरमहा १५०० रुपयांची आर्थिक मदत, तसेच १० रुपयांत नाश्ता आणि जेवण उपलब्ध करून देण्याचे प्रमुख आश्वासन दिले आहे. याशिवाय, प्रत्येक प्रभागात मिनी स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स आणि मुंबईतील पार्किंगची समस्या सोडवण्यासाठी महापालिकेतर्फे मोफत पार्किंगची व्यवस्था करण्याचे वचनही यात देण्यात आले आहे.
राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे २० वर्षांनंतर शिवसेना भवनात एकत्र आल्याने शिवसैनिकांमध्ये मोठे चैतन्य पाहायला मिळत आहे. या नव्या युतीचा ५ जानेवारीपासून मुंबईत संयुक्त प्रचार सभांचा धुरळा उडणार आहे. आता या “शिवशक्ती”च्या वचननाम्याला मुंबईकर किती प्रतिसाद देतात, हे १६ जानेवारीच्या निकालातून स्पष्ट होईल.




