Thursday, July 4, 2024
Homeराजकीयनाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळाची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळाची उद्धव ठाकरेंनी घेतली दखल

थेट स्थानिक पदाधिकाऱ्यांना केला फोन

नाशिक | Nashik

- Advertisement -

विधानपरिषदेच्या (VidhanParishad) नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीची मतमोजणी आज सकाळी आठ वाजेपासून शहरातील अंबड येथील वेअर हाऊसमध्ये सुरु आहे. ३० टेबलवर ही मतमोजणी पार पडत असून प्रत्येक टेबलवर सहा असे १८० कर्मचारी मतमोजणी करत आहे. मात्र, या मतमोजणीवेळी काही मतदान केंद्रावरील मतपेटीत मतदानापेक्षा जास्त मतपत्रिका आढळून येत असल्याने गोंधळ निर्माण झाला आहे. त्यानंतर आता नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेच्या गोंधळाची ठाकरे गटाचे प्र्मुख उद्धव ठाकरेंकडून दखल घेण्यात आली आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी गोंधळ; शिवसेनेने घेतला आक्षेप

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या (Nashik Teacher Constituency) मतमोजणी प्रक्रियेची उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) मातोश्रीवरून फोन करून दखल घेत चर्चा केल्याची माहिती समोर आली आहे. उद्धव ठाकरे यांनी मतमोजणी प्रक्रियेतील गोंधळाची नाशिकच्या ठाकरे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून फोन करून माहिती घेतल्याचे वृत्त समोर आले आहे. मतमोजणी प्रक्रियेत आत्तापर्यंत एकूण पाच अधिकची मते आढळून आली असून त्यावर ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. त्यामुळे सध्या या पाच मतपत्रिका बाजूला काढून ठेवण्यात आल्या असून याबाबत अंतिम टप्प्यात निर्णय घेण्यात येणार आहे.तसेच उद्धव ठाकरे यांनी जास्त मते आढळून आल्यानंतर शिवसेना पदाधिकाऱ्यांनी काय भूमिका घेतली याबाबतची माहिती विचारल्याचे समजते आहे.

हे देखील वाचा : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणी प्रक्रियेत पुन्हा गोंधळ

दरम्यान, नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीवेळी काही तासांपूर्वी एका मतपेटीत तीन मतपत्रिका जास्त आढळल्यामुळे मतमोजणी केंद्रावर गोंधळ निर्माण झाला होता. त्यामुळे यावर शिवसेनेने आक्षेप घेत मतमोजणीची प्रक्रिया काहीवेळ थांबवली होती. यानंतर चोपडा येथील २२ क्रमांकाच्या मतदान केंद्रात ९३५ मतदान झाल्याची नोंद होती.मात्र, याठिकाणी मतपेटीमध्ये ९३८ मतपत्रिका आढळून आल्याने गोंधळ निर्माण झाला होता. त्यानंतर नाशिक जिल्ह्यातील येवला आणि निफाड तालुक्यातील मतदान केंद्राच्या मतपेटीमध्ये एक-एक मतपत्रिका जास्त आढळून आली. त्यावरही ठाकरेंच्या शिवसेनेने आक्षेप घेतला आहे. मतमोजणी प्रक्रियेवेळी वारंवार होणाऱ्या गोंधळामुळे उद्धव ठाकरेंनी नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीची माहिती घेतल्याचे समोर आले आहे.

देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

- Advertisment -

ताज्या बातम्या