नागपूर | Nagpur
सध्या नागपूर येथे मंत्रिमंडळ विस्तारानंतर (Cabinet Expansion) राज्य सरकारचे (State Government) हिवाळी अधिवेशन सुरु आहे. या अधिवेशनास आज माजी मुख्यमंत्री आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हजेरी लावली. ते आज विधानपरिषदेच्या कामकाजात देखील सहभागी झाले होते. त्यानंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरेंनी महायुती सरकारवर हल्लाबोल केला. यानंतर आता उद्धव ठाकरेंनी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्रीपदी विराजमान झाल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी ही भेट घेतल्याचे सांगण्यात येत आहे. यावेळी दोघांमध्ये जवळपास ६ ते ७ मिनिटे चर्चा देखील झाली. विधानसभा निवडणुकांच्या निकालानंतर महायुतीच्या सरकारचा (Mahayuti Government) शपथविधी संपन्न झाला. त्यावेळी, मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांनी फोन करुन ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना शपथविधी सोहळ्याचे निमंत्रण दिले होते. मात्र, ठाकरे या शपथविधी सोहळ्याला अनुपस्थिती होती. त्यानंतर आज विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या दुसऱ्याच दिवशी उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली.
दरम्यान, फडणवीसांच्या भेटीनंतर बोलतांना उद्धव ठाकरे म्हणाले की, “ही केवळ सदिच्छा भेट होती, आम्ही निवडणूक जिंकू शकलो नाही, महायुती निवडणूक जिंकली. त्यामुळे आता महाराष्ट्राच्या (Maharashtra) हिताची काम होतील अशी अपेक्षा आहे. हे सरकार कसं आल ते आम्ही जनतेच्या माध्यमातून आवाज उठवणार आहोत”,असे त्यांनी म्हटले. यावेळी आमदार आदित्य ठाकरे, अनिल परब आणि वरुण सरदेसाई देखील उपस्थित होते.