Saturday, January 17, 2026
HomeराजकीयUddhav Thackeray : "देवाच्या मनात असेल तर…"; मुंबई महापौरपदाबाबत मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे...

Uddhav Thackeray : “देवाच्या मनात असेल तर…”; मुंबई महापौरपदाबाबत मातोश्रीवरुन उद्धव ठाकरे यांचं मोठं वक्तव्य

मुंबई । Mumbai

मुंबई महानगरपालिकेच्या अटीतटीच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने सत्ता खेचून आणली असली, तरी शिवसेना ठाकरे गटाने ६५ जागांसह आपले अस्तित्व भक्कम असल्याचे दाखवून दिले आहे.

- Advertisement -

तब्बल अडीच दशकांनंतर मुंबईची सत्ता हातातून गेल्यानंतर आज शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी नवनिर्वाचित नगरसेवकांशी ‘मातोश्री’वर संवाद साधला. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवतानाच सत्ताधारी महायुतीवर बोचरी टीका केली. “त्यांना वाटलं असेल कागदावरची शिवसेना संपवली, पण जमिनीवरची निष्ठा त्यांना कधीच संपवता येणार नाही, हे कालच्या निकालाने सिद्ध केले आहे,” अशा शब्दांत ठाकरेंनी विरोधकांना ठणकावून सांगितले.

YouTube video player

निकालांनंतर पहिल्यांदाच शिवसैनिकांना संबोधित करताना उद्धव ठाकरे भावनिक आणि तितकेच आक्रमक पाहायला मिळाले. “सत्ता, यंत्रणा आणि पैशाचा अफाट दुरुपयोग करून त्यांनी विजय मिळवला असेल, पण ते तुमच्यासारख्या शिवसैनिकांची निष्ठा विकत घेऊ शकले नाहीत. तुम्ही शून्यातून विश्व निर्माण करणारे लढवय्ये आहात आणि तुमच्या या जिद्दीचा मला अभिमान आहे,” असे म्हणत त्यांनी विजयी उमेदवारांचे अभिनंदन केले. गद्दारांना सोबत घेऊन त्यांनी केवळ सत्ता मिळवली नाही, तर मुंबई गहाण टाकण्याचे पाप केले आहे, असा थेट आरोप त्यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे नाव न घेता केला.

मुंबईच्या महापौरपदाबाबत बोलताना ठाकरेंनी सूचक विधान केले. “आपल्याला अपेक्षित असलेला बहुमताचा आकडा गाठता आला नाही हे सत्य आहे, पण मुंबईचा महापौर आपलाच व्हावा हे आमचे स्वप्न अद्याप कायम आहे. जर देवाच्या मनात असेल, तर तेही शक्य होईल,” असे ते म्हणाले. त्यांनी पुढे नमूद केले की, विरोधकांकडे केवळ ‘धन’शक्ती आहे, तर आपल्याकडे ‘जन’शक्ती आणि ‘तन-मन’ अर्पण करणारे कार्यकर्ते आहेत. याच शक्तीच्या जोरावर आपण महाबलिष्ठ सत्तेला घाम फोडला आहे, ही एकजूट भविष्यातही कायम ठेवण्याचे आवाहन त्यांनी केले.

भाषणाच्या शेवटी उद्धव ठाकरे यांनी आपल्या कार्यकर्त्यांपुढे नतमस्तक होत हे यश त्यांच्या चरणी अर्पण केले. “अनेक आमिषं दाखवली जात असतानाही तुम्ही डगमगला नाहीत. तुमच्या या निष्ठेचा पुढच्या पिढ्यांनाही अभिमान वाटेल. आपण पुन्हा लढू आणि पुन्हा जिंकू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. या भेटीमुळे पराभवानंतरही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांमध्ये नवा उत्साह पाहायला मिळत असून, आगामी राजकीय संघर्षासाठी त्यांनी कंबर कसली असल्याचे चित्र ‘मातोश्री’वर दिसत होते.

ताज्या बातम्या

असदुद्दीन

महाराष्ट्रातील घवघवीत यशानंतर खासदार असदुद्दीन ओवैसींची पहिली प्रतिक्रिया

0
मुंबई | Mumbaiअसदुद्दीन ओवैसी यांच्या एमआयएम पक्षाला महाराष्ट्रातील २९ महापालिकांच्या निवडणुकीत मोठे यश मिळाले आहे. राज्यात तीन आकडी संख्या गाठतानाच मुंबईतही एमआयएमने कमालीची कामगिरी...