मुंबई | Mumbai
महाराष्ट्रात येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडी म्हणून एकत्रित ताकदीने लढू. परंतु २८८ मतदारसंघात संघटनात्मक बांधणीसाठी ताकदीने कामाला लागा असा आदेश माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पक्षातील नेत्यांना दिले आहेत.
मुंबईतील शिवसेना भवन येथे आज जिल्हाप्रमुख, प्रमुख नेते, आमदार, खासदारांची बैठक उद्धव ठाकरेंनी घेतली. या बैठकीत लोकसभा निवडणुकीचा निकाल आणि येणाऱ्या निवडणुकीतील तयारीचा आढावा घेण्यात आला. आगामी विधानसभा आणि विधान परिषद निवडणुकीसाठी जोमाने उतरण्यासाठी ठाकरेंनी आवाहन केले आहे.
ते पुढे म्हणाले की, महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही विधानसभा निवडणूक लढू आणि महाराष्ट्राची सत्ता काबीज करू. परंतु ते करत असतानाच संघटना बळकटीच्या दृष्टीने २८८ मतदारसंघात आज आहे त्यापेक्षा अधिक मजबूत करण्यासाठी कामाला लागा असे जिल्हाप्रमुखांना आदेश दिलेत. एखादी विधानसभा आम्ही लढू किंवा नाही परंतु त्याठिकाणी २८८ मतदारसंघात संघटना जिद्दीने उभी राहिली पाहिजे असे बैठकीत ठरले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणूक, पदवीधर, शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुका असतील त्याबाबतचा तयारीचा आढावाही आजच्या बैठकीत घेण्यात आला.
“भाजपा आणि त्यांच्या इतर मित्रमंडळींना रोखण्यात आलं आहे. नरेंद्र मोदींचं बहुमत कमी करण्यात किंवा भाजपाला बहुमतमुक्त करण्यात महाराष्ट्राचं, महाविकास आघाडीचं मोठे योगदान आहे. ज्या महाविकास आघाडीने भाजपाला दिल्लीतून बहुमतमुक्त केलं ती महाराष्ट्रातही एकत्रित ताकदीने लढेल. १८० ते १८५ जागा जिंकू असा निर्धार आम्ही केला आहे असेही संजय राऊत म्हणाले. तसेच पावसाळा असल्याने बंद दाराआड सगळ्या चर्चा सुरु असून त्या महाराष्ट्रभर होतील असे सांगितलं.