मुंबई | Mumbai
आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय घडामोडींना वेग आला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. दोन्ही पक्षांमध्ये युती होण्याअगोदर जागा वाटपातील प्रलंबित मुद्दे सोडवण्यासाठीच आज उद्धव ठाकरे हे राज ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले असल्याचे समजत आहे.
227 जागा असलेल्या मुंबई महापालिका निवडणुकीत मनसे महत्वाच्या जागांवर आडून आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे सेनेतील नेते आणि मनसेतील नेते यांच्यात चर्चेचा पहिला टप्पा पार पडला असल्याचे समजते. पण त्यात काही जागांवरून मतभिन्नता दिसून आली. काही जागांवर दोन्ही पक्षही आग्रही असल्याने तिढा निर्माण झाला. या बैठकीत कोणताही सकारात्मक तोडगा निघाला नसल्याने दोन्ही जागा वाटपाचा पेच निर्माण झाल्याने त्यावर तोडगा काढण्यासाठी आता उद्धव ठाकरे स्वतः राज ठाकरे यांच्या भेटीला शिवतीर्थावर आल्याची माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
या बैठकीला दोन्ही पक्षातील दुसऱ्या आणि तिसऱ्या फळीतील नेत्यांची अनुपस्थिती आहे. दोन्ही भावांमध्ये जागावाटपावरुन संभाव्य चर्चा होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ठाकरे बंधूंची युती होणार असे संकेत दिसत असले तरीसुद्धा याबाबत अधिकृत घोषणा केलेली नाही. असे झाले तर महाराष्ट्रातील राजकारणावर आणि आगामी निवडणुकांवर याचा मोठा परिणाम होऊ शकतो असे बोलले जात आहे.
ठाकरे गटाने सुरुवातीला प्रत्येक मतदारसंघात दोन जागा देण्याचा प्रस्ताव ठेवला होता, तर मनसेने काही विभागांमध्ये तीन जागांची मागणी केल्याने चर्चा थांबली होती, अशी माहिती सूत्रांनी दिली. वरळी, शिवडी, दादर, माहीम आणि भांडुप यांसारख्या मतदारसंघांमध्ये दोन्ही पक्षांची ताकद असल्याने जागावाटप गुंतागुंतीचे झाले आहे. संजय राऊत यांच्या अनुपस्थितीत अनिल परब आणि वरुण सरदेसाई यांच्यावर चर्चेची जबाबदारी आहे. या बैठकीतून जागावाटपाचा तिढा सुटून युतीवर शिक्कामोर्तब होणार का, याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




