मुंबई | Mumbai
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री किरेन रिजिजू (Kiren Rijiju) यांनी लोकसभेत (Loksabha) वक्फ सुधारणा विधेयक सादर केल्यानंतर सत्ताधारी-विरोधकांमध्ये दुपारी १२ वाजल्यापासून ते मध्यरात्रीपर्यंत चर्चा झाली. यानंतर मध्यरात्री या विधेयकावर मतदान (Voting) पार पडले. यावेळी ४६४ मतांपैकी २८८ मते विधेयकाच्या बाजूने तर २३२ मते विरोधात पडली. त्यामुळे या मतदानानंतर लोकसभेत वक्फ दुरुस्ती विधेयक अखेर बहुमताने मंजूर (Waqf Amendment Bill) झाले. यावेळी ठाकरेंच्या शिवसेनेने वक्फ दुरुस्ती विधेयकाच्या विरोधात मतदान केले. त्यावरून भाजपकडून ठाकरेंच्या शिवसेनेवर टीका केली जात आहे. या टीकेला आज उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी पत्रकार परिषद घेत जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.
यावेळी बोलतांना ते म्हणाले की, “आज ३ एप्रिल आहे आणि काल २ एप्रिल होती. अशी सुरुवात अशासाठी केली की आठवण होऊ नये म्हणून काल वक्फची चर्चा घडवली. अमेरिकेने भारताला सांगितलं होतं की कर कमी करावे नाहीतर आम्हीही कर लादू. याची सुरुवात झाली आहे याकडे दुर्लक्ष व्हावे म्हणून वक्फ विधेयक (Waqf Amendment Bill) मांडले गेले”, असा आरोप उद्धव ठाकरेंनी केला.
पुढे ते म्हणाले की,”आर्थिक संकट असताना, काय पाऊले उचलण्याची गरज आहे. ही भूमिका सरकाराने अगोदर घेतली पाहिजे होती. हे देशासमोर येणारे आर्थिक संकट पंतप्रधान मोदींनी सांगायला हवे होते. परिणाम काय होतील याची चर्चा सरकारने (Government) करायला हवी होती. करोना काळात मी मुख्यमंत्री होतो. मोदीही तेव्हा घरी बसूनच काम करत होते. आमच्याशी त्यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंग केली होती. तसं काहीतरी करुन मोदींनी अमेरिकेच्या करांबाबत सांगितलं असतं तर आम्ही पाठिंबा दिला असता”, असेही उद्धव ठाकरेंनी सांगितले.
ते पुढे म्हणाले की, “वक्फच्या जमिनी (Land) ताब्यात घेतल्या जाणार हेच आता दिसत आहे. वक्फच्या जमिनींवर ह्यांचा डोळा आहे. काल अमित शाहांनी तर जिन्नांनाही लाजवेल अशा पद्धतीने मुस्लिमांची बाजू घेतली. मग तुम्ही हिंदुत्व सोडलं का असा सवाल उद्धव ठाकरेंनी विचारला. तसेच बाळासाहेबांनी मुस्लिमांना इज्तेमासाठी परवानगी दिली होती. तीच जागा आता व्यापाऱ्यांसाठी उद्योजकांच्या खिशात घातली जात आहे. किरेन रिजिजूंपासून सर्वजण माना खाली घालून पाहत होते. हे काय चाललंय, वक्फ सुधारणा विधेयक मुस्लिमांच्या हिताचं आहे का असेल तर मग हिंदुत्व तुम्ही सोडलं की आम्ही सोडलं?” असाही सवालही उद्धव ठाकरेंनी भाजपला विचारला.
तसेच “संसदेच्या (Parliament) जागेवर वक्फचा दावा ही निव्वळ लावालावी आहे. भाजपने जुमलेबाजी आधी बंद करावी. गरिबांमधील मारामाऱ्या बंद कराव्या. आम्ही बिलाला नाहीतर भ्रष्टाचाराला विरोध केला आहे. विधेयकासंदर्भात विरोधकांनी सुचवलेल्या सुधारणांकडे सत्ताधाऱ्यांनी दुर्लक्ष केले. काँग्रेसचा आमच्यावर आजिबात दबाव नाही. आम्ही एनडीएत असतो तरीही अशीच भूमिका घेतली असती. आमची भूमिका पक्षाच्या कार्यकर्त्याला पटली आहे”, असे उद्धव ठाकरे म्हणाले.
पुढे ते म्हणाले की,”भाजपाचे काय चाललंय कळत नाही. कधी सांगतात औरंगजेबाची कबर खोदा, यांचे लोक कुदळ फावडी घेऊन जातात मग वरुन आदेश येतो की थांबा खोदू नका. आत्तापर्यंतचा अनुभव असा आहे की भाजपाचे दाखवायचे दात आणि खायचे दात वेगळे आहेत. ३७० कलम काढलं गेलं तेव्हा आम्ही पाठिंबा दिला. हजारो कश्मिरी पंडीत निर्वासित झाले होते. त्यावेळी हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) त्यांना आसरा दिला. ३७० कलम काढून इतकी वर्षे झाली आहेत. काश्मिरी पंडितांना किती जमिनी परत मिळाल्या? हे आधी भाजपच्या लोकांनी, गृहमंत्र्यांनी सांगावं. पाकव्याप्त काश्मीरबाबत काही भूमिका घेतलेली नाही. चीनच्या अतिक्रमाणबाबत कुणीही काही बोलत नाही”, असेही ठाकरेंनी म्हटले.