मुंबई | Mumbai
बदलापूर घटनेच्या विरोधात राज्यात आक्रोश सुरु आहे. राज्यभरातील जनतेत संताप व्यक्त केला जात आहे. ही घटना घडल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने देखील पोलीस, राज्य सरकारला फटकारले आहे. आता विरोधकाही एकटवले आहे. बदलापूर घटनेच्या निषेधार्थ राज्यात विरोधकांनी २४ ऑगस्ट रोजी बंद पुकारला आहे. हा बंद कसा असणार आहे या बद्दल शिवसेना उध्दव ठाकरे गटाचे प्रमुख उध्दव ठाकरे यांनी सविस्तर सांगितले.
दुपारी दोन वाजेपर्यंत पाळावा, त्यातून अत्यावश्यक सेवा वगळण्यात यावी, असे उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. उद्धव ठाकरे यांनी सांगितले की, राजकीय कारणासाठी उद्याचा बंद नाही. विकृती विरुद्ध संस्कृती यासाठी बंद आहे. पालकांना असे वाटते की मुलगी शाळेत सुरक्षित राहील का? कार्यालये असतील, रुग्णालये असतील तिथे आपण सुरक्षित राहू का? असे माता भगिनींना वाटत आहे. या अस्वस्थतेला वाचा फोडण्यासाठी बंद आहे. आम्ही विरोधी आहोत. विकृतीच्या विरोधात आम्ही बंद पुकारत आहोत. आजपर्यंत जसा बंद झाला, तसाच बंद असेल. सर्व नागरिकांचा बंद असेल. जात पात धर्माचा भेद नसेल. या बंदमध्ये पेपर, अग्निशमन दल आरोग्य सेवा चालू राहतील. सणासुदीचे दिवस आहे. गणपती बाप्पा येत आहे. दहीहंडीचा सराव आहे. उद्या दुपारी दोन वाजेपर्यंत बंद पाळा.
सरकारला काही म्हणू दे. मी जनतेच्या बाजूने बोलत आहे. केवळ निवडणुकांमध्ये जनतेने मत व्यक्त करावे, असे नाही. इतर वेळी पण जनता व्यक्त होऊ शकते. प्रशासन वेळीच कामाला लागले असते तर हे घडले नसते. उच्च न्यायालयाने सरकारला थोबडवले आहे. जनतेचे न्यायालय वेगळे आहे. जेव्हा सर्व दरवाजे बंद असतात, तेव्हा जनतेचा दार खुले होते. बंदचे यश अपयश हे संस्कृती आणि विकृतीवर राहणार आहे. सरकारला दाखवून द्यायचे आहे.
लोकल, बस बंद ठेवावी, कारण संतापाचा बंद आहे. सरकारच्या नेत्यांना पण मुली आहेत. बंदच्या मागून तुम्ही पोलिसांची दादागिरी होऊ देऊ नका. बंदचा फज्जा उडवू देऊ नका. नाहीतर जनता तुम्हाला जागा दाखवेल. हा बंद तुमच्या कुटुंबासाठी पण आहे. पोलिसांची महासंचालक महिला आहे. त्या पण लाडकी बहीण होऊ शकतात. बाकी, मुख्यमंत्र्यांना राखी बांधायला जाऊ शकतात. कारण ते फक्त मत मागायला जातात. स्वतःहून बंदमध्ये सहभागी व्हा, कारण तुमच्या मुलींसाठी हा बंद आहे. कायदा जर आमचे रक्षण करत नसेल तर त्यांना त्यांची जाणीव करून देणे गरजेचे आहे. असे उध्दव ठाकरे यावेळी म्हणाले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा