Monday, August 17, 2026
HomeनगरUddhav Thackeray : 'गद्दार' वगळता मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर…; शिर्डीत...

Uddhav Thackeray : ‘गद्दार’ वगळता मराठी माणूस पंतप्रधान होणार असेल तर…; शिर्डीत उद्धव ठाकरेंचे मोठं विधान

शिर्डी । Shirdi

शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याचा आज तिसरा दिवस असून, आज सकाळी त्यांनी शिर्डी येथील प्रसिद्ध साईबाबा मंदिरात जाऊन दर्शन घेतले. या दर्शनानंतर आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारचे विधेयक, भाजपची अंतर्गत राजकीय खेळी आणि शिंदे गटावर अत्यंत तिखट शब्दांत प्रहार केला. “गद्दार सोडून महाराष्ट्राचा कोणताही मराठी माणूस जर पंतप्रधान होणार असेल, तर शिवसेना त्याला नक्कीच पाठिंबा देईल,” असे मोठे विधान त्यांनी यावेळी केले.

- Advertisement -

पत्रकार परिषदेत बोलताना उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या राजकीय प्रवासावर सूचक टिप्पणी केली. ते म्हणाले, “मराठी माणूस पंतप्रधान पदाचे स्वप्न पाहत असेल तर त्यात काहीच गैर नाही. मला देवेंद्र फडणवीसांच्या करिअरची मनापासून काळजी वाटते. नितीन गडकरींना संघाचा पाठिंबा होता, मात्र त्यांना बदनाम करण्यात आले. आता फडणवीसांनाही संघाचा पाठिंबा असल्याचे माझ्या कानावर आले आहे. पण, संघाचा पाठिंबा असलेला माणूस या शर्यतीत येऊच नये म्हणून दिल्लीतून काही कारस्थान सुरू आहे का? आणि ‘शहासेना’ त्यांची सुपारी घेऊन हे काम करत आहे का? अशी शंका घ्यायला जागा आहे.”

यावेळी त्यांनी मध्यप्रदेशातील शिवराज सिंह चौहान यांचे उदाहरण देत, वाढत्या लोकप्रियतेमुळे नेत्यांचे पंख कसे छाटले जातात, याकडे लक्ष वेधले. “हा भाजपला अंतर्गत मोठा धोका असून, ही फोडाफोडी आणि गद्दारी संघाला मान्य आहे का, याचा विचार आता संघाच्या कार्यकर्त्यांनी केला पाहिजे,” असेही ठाकरे म्हणाले. केंद्रातील आगामी विधेयकांवर आणि दक्षिण भारताच्या आक्षेपांवर बोलताना उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. “भारतीय जनता पक्षाकडे सध्या दोन-तृतीयांश बहुमत नाही. जेवढे खासदार त्यांच्याकडे आहेत, त्यातील बहुतांश इतर पक्षांमधून फोडून आणलेले आहेत. हे विधेयक मंजूर करण्यासाठी आवश्यक असणारे बहुमत गोळा करण्यासाठीच शिवसेना, तृणमूल आणि आप सारखे पक्ष फोडण्याचे राजकारण सुरू आहे.”

महिला आरक्षणावर आपली भूमिका स्पष्ट करताना ते म्हणाले, “महिला आरक्षण या क्षणापासून लागू झाले पाहिजे. त्यासाठी सध्याच्याच खासदारांच्या संख्येत आरक्षण द्या. सीमांकन (Dielimitation) करताना उत्तर आणि दक्षिण असा वाद निर्माण न करता, देशातील सर्व प्रमुख विरोधी पक्षांच्या नेत्यांना विश्वासात घेऊन चर्चा करणे गरजेचे आहे, केवळ फोडाफोडी करून नाही.”

खासदार भाऊसाहेब वाघचौरे यांच्या मतदारसंघात होणाऱ्या कार्यकर्ता मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर, पक्ष सोडलेल्या खासदारांवर त्यांनी कडक शब्दांत टीका केली. “काही लोक सोडून गेले म्हणजे पक्ष संपत नाही. जे गेले त्यांच्या गद्दारीमुळे निष्ठावंत शिवसैनिक अधिक त्वेषाने आणि जिद्दीने कामाला लागले आहेत. आमचे सरकार गद्दारी करून पाडले, चिन्ह चोरले, बाळासाहेबांचा चेहरा चोरण्याचा प्रयत्न केला. कारण तो ‘बिनबापाचा पक्ष’ आहे, त्यांना स्वतःचा बाप बदलावा लागतो. पण मी माझ्या वडिलांच्या (बाळासाहेबांच्या) फोटोच्या आणि विचारांच्या जोरावर नवीन निशाणी घेऊन ९ खासदार निवडून आणून दाखवले,” असा टोला त्यांनी एकनाथ शिंदे यांना लगावला.

आदित्य ठाकरे यांच्यावर होणाऱ्या राजकीय हल्ल्यांवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले, “ठाकरे कुटुंबाला पाच-सहा पिढ्यांची सामाजिक आणि राजकीय परंपरा आहे. आम्ही जनतेसाठी काम करतो. पण यांच्याकडे स्वतःच्या पोराला खासदार करायचे, मग मंत्री करायचे, सगळं काही स्वतःच्याच घराण्याला पाहिजे ही यांची वृत्ती आहे. ठाकरे घराण्यानेच यांना एकेकाळी आधार दिला होता, हे त्यांनी विसरू नये.”

राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केलेल्या ‘आत्मपरीक्षणाच्या’ सल्ल्यावर बोलताना ठाकरेंनी त्यांचा खरपूस समाचार घेतला. “त्यांचा स्वतःचा आत्मा कुठे आहे? त्यांचा आत्मा कधी आमच्याकडे, कधी काँग्रेसमध्ये, तर आज भाजपमध्ये असतो. त्यांनी आधी स्वतःच्या आत्म्यावर नियंत्रण ठेवावे आणि बघावे की त्यांचा आत्माराम कुठे कुठे फिरतोय,” असा खोचक टोला त्यांनी लगावला. शेवटी, “भाजपसाठी वर्षानुवर्षे राबलेले जुने कार्यकर्ते आज उपऱ्यांच्या चट्या उचलतायत, त्यामुळे भाजपने गद्दारांना डोक्यावर न बसवता आपल्या जुन्या कार्यकर्त्यांना संधी दिली पाहिजे आणि स्वतःची पक्षबांधणी करावी,” असा सल्लाही त्यांनी भाजपला दिला.

ताज्या बातम्या

Accident News : दूध टँकर व दुचाकीचा अपघात; एक ठार

0
अकोले |प्रतिनिधी| Akole तालुक्यातील लिंगदेव येथील ठाकरवाडी परिसरात दुचाकी (Bike) आणि दूध टँकरमध्ये (Milk Tanker) जोरदार धडक होऊन भीषण अपघात (Accident) होवून दुचाकीस्वार जागीच ठार...