मुंबई । Mumbai
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी मंगळवारी राज्यसभेत बोलताना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबाबत केलेल्या एका विधानावरून सध्या राजकीय वातावरण तापल्याचं पाहायला मिळत आहे. एकीकडे दिल्लीत हिवाळी अधिवेशनात या विधानावरून विरोधकांनी रान उठवलेलं असताना दुसरीकडे महाराष्ट्राच्या विधानपरिषदेतही विरोधकांनी यावरून सरकारवर हल्लाबोल केला आहे.
आज त्याच संदर्भात उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि ‘आरएसएस’वर संताप व्यक्त करत हल्लाबोल केला आहे. उद्धव ठाकरे बोलताना म्हणाले, गेले अडीच तीन वर्ष त्याही आधीपासून सातत्याने पाहत आहोत. भाजपा आणि त्यांचे उमर्ट नेते महाराष्ट्रातल्या महापुरुषांचा, महाराष्ट्रातल्या देवतेंचा ज्या प्रकारे अपमान करत आहे, तो अपमान आता सहनशीलतेपलीकडे गेला आहे. जेव्हा कोशयारी नावाचे गृहस्थ राज्यपालपदी बसवलं त्यांनी महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले यांच्या लग्नाच्या वयावरुन अपमान केला होता.
तसेच, विचित्र टिप्पणी केली होती. छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केला होता. आम्ही मोर्चा जरुर काढलेला. पण भाजपने ना त्यांच्याकडून माफी मागून घेतली किंवा दूर केलं. मधल्याकाळात घाईघाईन छत्रपती शिवाजी महाराजांना पुतळा बसवताना त्यात भ्रष्टाचार केला. तो पुतळा आठ महिन्यात पडला. त्यानंतर काय घडलं तुम्हाला कल्पना आहे. भाजपच्या हृदयातील काळं बाहेर आलं आहे, देशानं अन् महाराष्ट्रानं शहाणं व्हावं. मोदी-मोदी करून अमित शाह यांना स्वर्ग मिळणार आहे का?, असा सवालही उद्धव ठाकरेंनी केला.