मुंबई । Mumbai
संसद सदस्यांनी सभागृहात ‘धन्यवाद’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’ किंवा इतर कोणत्याही घोषणा देऊ नयेत, अशा आशयाच्या संसद सचिवालयाच्या निर्देश पत्रावर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी तीव्र आक्षेप घेतला आहे. “आमचे खासदार सभागृहात ‘वंदे मातरम्’ म्हणणारच. हिंमत असेल तर कारवाई करून दाखवा,” असे थेट आव्हान ठाकरे यांनी भाजपला दिले आहे. तसेच, “असे आदेश काढणारी ‘मेकॉलेची अवलाद’ भाजपमध्ये कुठून आली?” असा बोचरा सवालही त्यांनी उपस्थित केला.
आज (शुक्रवारी) दुपारी मातोश्री येथे आयोजित पत्रकार परिषदेत उद्धव ठाकरे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका मांडली. नाशिकच्या तपोवनातील वृक्षतोडीला शिवसेनेचा ठाम विरोध राहील, असे स्पष्ट करतानाच त्यांनी कुंभमेळ्यातील खर्चावर नियंत्रण ठेवण्याच्या भूमिकेमुळेच नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटत नसल्याचा गंभीर आरोपही केला. याचवेळी त्यांनी राज्यसभा सचिवालयाच्या सदस्यांच्या वर्तवणुकीसंबंधी परिपत्रकावर तीव्र नाराजी व्यक्त करत मोदी सरकारला खडे बोल सुनावले.
“संसद सदस्यांनी यापुढे सभागृहात ‘थँक्यू’, ‘जय हिंद’, ‘वंदे मातरम्’ म्हणायचे नाही, अशा सूचना देण्यात आल्या आहेत. हे पूर्णपणे अनाकलनीय आहे,” असे ठाकरे म्हणाले. “या देशात राहायचे असेल, तर ‘वंदे मातरम्’ म्हणावेच लागेल, असे भाजप म्हणायचे. मग आता भाजपला काय झाले आहे? सभागृहात ‘वंदे मातरम्’ म्हणायचे नाही, असा नियम काढला आहे. हे कसले राष्ट्रप्रेम?” असा सवाल त्यांनी केला. “आता पाकिस्तानात कोण जाणार, कुणाला पाठवायचे? आपल्या सभागृहात आपणच ‘वंदे मातरम्’ म्हणायचे नाही? मॅकॉलेची अवलाद भाजपमध्ये कुठून आली?” अशा बोचऱ्या शब्दांत टीका करत त्यांनी भाजपला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांनी आपल्या खासदारांच्या भूमिकेवर ठाम राहत भाजपला थेट आव्हान दिले. “आमचे खासदार ‘वंदे मातरम्’ म्हणणारच. कोण आपल्याला बाहेर काढतंय, बघूयात,” असे ते म्हणाले. तसेच, “भाजपमध्ये हिंमत असेल तर आमच्या खासदारांवर निलंबनाची कारवाई करून दाखवा,” असेही आव्हान त्यांनी दिले.
पुढील वर्षी नाशिकमध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याबद्दल बोलताना ठाकरे यांनी सरकारवर निशाणा साधला. “कुंभमेळा व्हायलाच हवा, कारण तो अनेक वर्षांची परंपरा आहे. गेल्यावेळीही तिथे कुंभमेळा झाला होता. तिथे येणाऱ्या लाखो साधू-संत आणि भाविकांची गैरसोय होऊ नये, यासाठी सुविधा पुरवण्याचे काम सरकारचे आहे,” असे ते म्हणाले. गेल्यावर्षी प्रयागराजमध्ये चेंगराचेंगरीत भाविकांचा जीव गेला होता, या घटनेचा उल्लेख करत, “भाविकांना सोयी-सुविधा देताना पारदर्शकपणा असला पाहिजे,” असे मत त्यांनी व्यक्त केले. “आजही नाशिकचा पालकमंत्री नेमला जात नाही, हे एक कोडे आहे. या कोड्याचे उत्तर कुंभमेळ्याच्या एकूण खर्चात आहे का?” असा सवाल करत त्यांनी सरकारला घेरले.
कुंभमेळ्यानिमित्त साधू ग्रामची निर्मिती होणार आहे. मागील वेळेस ते नेमके कुठे झाले होते, याची माहिती मिळू शकते. मात्र, यावेळी तपोवनातील काही झाडे तोडण्याच्या वृत्तावर ठाकरे यांनी तीव्र विरोध दर्शवला. “तपोवन म्हणजे प्रभू श्रीरामचंद्र, सीता आणि लक्ष्मण काही काळ वास्तव्यास होते, अशी मान्यता आहे. प्रभू रामचंद्रांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या मोजक्या जागांपैकी तपोवन ही एक आहे,” असे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. “तपोवनमध्ये जवळपास ६० वेगवेगळ्या प्रकारची झाडे आहेत, त्यातील अनेक औषधी वनस्पती आहेत. अनेक वर्षांपासून तिथे निसर्गाचे चक्र सुरू आहे. या तपोवनाने आपल्यापेक्षाही जास्त कुंभमेळे अनुभवलेले असतील,” असे सांगत तपोवन नष्ट करण्याच्या निर्णयाला शिवसेना ठामपणे विरोध करेल, अशी भूमिका त्यांनी स्पष्ट केली.




