अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
पाथर्डी तालुक्यातील औषध कंपनीतील वैद्यकीय प्रतिनिधी असलेल्या तरूणाच्या तीन वेगवेगळ्या बँक खात्यांमधून सायबर चोरट्यांनी यूपीआय व्यवहारांच्या माध्यमातून तब्बल 10 लाख दोन हजार 779 रूपये परस्पर काढून घेतल्याची घटना समोर आली आहे. या प्रकरणी संबंधिताने राष्ट्रीय सायबर गुन्हे हेल्पलाईन 1930 वर तक्रार नोंदवून येथील सायबर पोलीस ठाण्यातही फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी पाथर्डी तालुक्यातील लोहसर, खांडगाव येथे राहतात. ते जनावरांच्या औषधनिर्मिती कंपनीत वैद्यकीय प्रतिनिधी (एमआर) म्हणून कार्यरत आहेत. 4 जुलै रोजी सायंकाळी 7.30 ते रात्री 8.10 या अवघ्या चाळीस मिनिटांच्या कालावधीत त्यांच्या मोबाईल क्रमांकाशी संलग्न असलेल्या आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक आणि सेंट्रल बँक ऑफ इंडिया या तीन बचत खात्यांमधून अज्ञात व्यक्तीने त्यांच्या परवानगीशिवाय यूपीआयव्दारे सलग व्यवहार करून रक्कम परस्पर वळती केल्याचे उघड झाले. फसवणुकीची माहिती मिळताच बांगर यांनी तातडीने राष्ट्रीय सायबर गुन्हे तक्रार हेल्पलाईन 1930 वर संपर्क साधून तक्रार नोंदवली.
सायबर पोलिसांकडे सोमवारी (6 जुलै) दिलेल्या फिर्यादीनुसार, आयसीआयसीआय बँकेच्या खात्यातून अनेक टप्प्यांत सुमारे 7 लाख 41 हजार, कोटक महिंद्रा बँकेच्या खात्यातून दोन लाख 52 हजार, तर सेंट्रल बँक ऑफ इंडियाच्या खात्यातून एक लाख 6 हजार रूपये असे मिळून एकूण 10 लाख दोन हजार 779 रूपये अज्ञात व्यक्तीने यूपीआय व्यवहारांव्दारे काढून घेतल्याचे नमूद करण्यात आले आहे. बँक खात्यांची माहिती आणि डिजिटल पुराव्यांच्या आधारे पुढील तपास सुरू आहे. पोलीस निरीक्षक सागर ढिकले अधिक तपास करीत आहेत.




