मुंबई | Mumbai
दोन ते अडीच महिन्यांपासून संतोष देशमुख हत्या प्रकरणात उज्ज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्याची मागणी होत होती. या संदर्भातील माहिती राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून याप्रकरणी उज्ज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी मस्साजोगचे ग्रामस्थ आणि आमदार सुरेश धस यांनी केली होती. त्यावर अखेर, देशमुख कुटुंबीय गावकऱ्यांसह अन्नत्याग आंदोलनास बसल्यानंतर निकम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारने काढलेल्या आदेशानंतर बोलताना उज्ज्वल निकम यांनी सविस्तर भाष्य केले.
काय म्हणाले उज्वल निकम?
माझी सरकारी वकील म्हणून नियुक्ती करण्यात यावी, यासाठी मस्साजोग ग्रामस्थांनी अन्नत्याग आंदोलन सुरू केले होते, हे ऐकून मी खूप व्यथित झालो होतो. काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळवले की, सदर खटला चालविण्यासाठी मी तयार आहे. त्यानंतर मुख्यमंत्री कार्यालयाने तसे आदेश दिले आहेत. मस्साजोगच्या रहिवाशांनी उपोषण सोडावे, असे मी आवाहन करतो. या देशात कायदा आणि न्याय सर्वोच्च आहे. प्रकृतीला त्रास होईल, असे कोणतेही कृत्य कुणीही करू नये. या खटल्यात पोलिसांनी आरोपपत्र दाखल करताच आम्ही तातडीने हा खटला चालिवण्यास घेऊ, अशी प्रतिक्रिया वकील उज्ज्वल निकम यांनी मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर माध्यमांशी बोलताना दिली.
यावेळी त्यांनी विरोधकांच्या आरोपांवरही भाष्य केले असून ते म्हणाले, याप्रकरणी, माझ्यावर करण्यात येणाऱ्या राजकीय टिकेची मला गंमत वाटते, एका निवडणुकीत मी लढलो आणि राजकीय परिपक्वता नसलेले लोक माझ्यावर टीका करत आहेत. गावकऱ्यांना मी आवाहन करतोय तुम्ही काळजी करू नका, मी आहे असेही उज्ज्वल निकम यांनी म्हटले. न्यायासाठी मी लढणारा आहे, हे महाराष्ट्रातल्याच नाही तर देशातल्या जनतेला माहीत आहे. पोपटगिरी करणाऱ्या लोकांना पोपटगिरी करू द्या, त्यांना मी भीक घालत नाही. देशमुख कुटुंबियांनी आणि गावकऱ्यांनी अन्नत्याग आंदोलन करू नये. राजकीय लोकांच्या चिथावणीकडे लक्ष देऊ नका, असे आवाहनही निकम यांनी देशमुख कुटुंबीयांना केले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा