Friday, November 22, 2024
Homeनगरकोल्हार पाठोपाठ उक्कलगावातील वातानुकुलीत दारू अड्डा अखेर उद्ध्वस्त

कोल्हार पाठोपाठ उक्कलगावातील वातानुकुलीत दारू अड्डा अखेर उद्ध्वस्त

दारूबंदी उत्पादन शुल्कने रात्री उशीरा पकडली लाखोंची दारू

श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur

तालुक्यातील उक्कलगाव येथे मोठ्या प्रमाणात अवैध धंद्यांचा सुळसुळाट सुरू असून गावठी बनावटीसह देशी-विदेशी दारू अवैध मार्गाने येथे खुलेआम विकली जात होती. विशेष म्हणजे विशिष्ट प्रकारच्या गोळ्या मिक्स करून येथे दारू बनवली जात असल्याची चर्चा असून त्यातून सात ते आठ तरुणांना जीव गमवावा लागला आहे.

- Advertisement -

या पार्श्वभूमीवर काल मंगळवारी संदीप मोढे नामक मुलाचा दारूच्या नशेत मृत्यू झाल्याने संतप्त झालेल्या महिलांनी ‘ त्या’ दारूअड्ड्यावर हल्लाबोल करत दुकानातील दारूच्या बाटल्या व अंडी रस्त्यावर फेकून दिली. एवढ्यावरच न थांबता दुकानातील इतर सामान जाळून टाकले. प्राथमिक शाळेच्या लगत हे दारू अड्डे सुरू असून ज्या अड्ड्याची जाळपोळ करण्यात आली तो अड्डा चालक पोलिसांना जेवणाचे डबे पुरवीत असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे माझे डिपार्टमेंटशी संबंध असून माझे कुणी काही करू शकत नाही, असे हा दारू अड्डा चालक लोकांना खुलेआम सांगत होता. त्याला गावातूनही राजाश्रय असल्याचे बोलले जात आहे.

या दारू अड्डा चालकाने मद्य शौकिनांसाठी भर रस्त्यावर वातानुकुलीत यंत्रणा कार्यान्वित करून उधारीवर धंदा सुरू ठेवला होता. ही दारू सेवन केल्याने रात्रीतून 7 ते 8 तरुण झोपेतच मृत झाल्याच्या घटना घडल्या असून काल संदीप मोढे नामक तरुणाचा मृत्यू झाल्याने वडार समाजातील महिलांचा राग अनावर होऊन त्यांनी भल्या सकाळीच त्या विनापरवाना वातानुकुलीत दारू दुकानावर हल्लाबोल करून दारूसह इतर सामानाची जाळपोळ करून नष्ट केले. या महिलांना आदिवासी समाजातील महिलांनीही साथ दिल्याने इतर दारू अड्डे चालकांचे धाबे दणाणले. दरम्यान, काही दिवसांपूर्वीच कोल्हार भगवतीपूर येथील महिलांनी आक्रमक होत गावातील दारूअड्डा नष्ट केला होता. त्यानंतर आता उक्कलगावात ही घटना घडली आहे.

दरम्यान, संतप्त महिलांनी आपला मोर्चा ‘भिल्लहाटी’ परिसरातील दुसर्‍या दारू अड्ड्याकडे वळविला असता दारू अड्डा चालविणार्‍या महिला चालकाने अरेरावीची भाषा वापरून महिलांना आतमध्ये येण्यास मज्जाव केला.संतप्त महिलांनी जोपर्यंत पोलीस कारवाई करत नाहीत तोपर्यंत संदीप मोढे यांचा अंत्यसंस्कार होणार नाही असा निर्णय घेतल्याने बेलापूर औट पोस्टचे श्री.कोळपे घटनास्थळी हजर झाले. सरपंच रवीना शिंदे, सोसायटीचे चेअरमन व ग्रा.पं. सदस्य पुरुषोत्तम थोरात, उपसरपंच नितीन थोरात, ग्रा.पं.सदस्य अनिल थोरात, पोलीस पाटील हिराबाई मोरे, ज्ञानदेव थोरात, रवींद्र जगधने यांनी संतप्त महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला.

मात्र महिला ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हत्या. त्यांनी आपला मोर्चा वडार वाड्यातील मध्यवस्तीत असलेल्या दारू अड्ड्याकडे वळवून तेथील दुकानाचे कुलूप तोडून आत असलेल्या देशी भिंगरी व फ्रिजमधील बियरच्या बाटल्या बाहेर काढल्या. तेथून पुढे जात माध्यमिक शाळेनजीक असलेल्या ‘माती वडार’ वसाहतीतील दारू अड्ड्यावर हल्लाबोल करत दुकानाची उचकापाचक केली असता तेथील महिला चालक अगोदरच खबर लागल्याने दुकानाला कुलूप लावून मुद्देमालासह पसार झाली होती. एवढी मोठी घटना घडूनही पोलिसांनी श्री.कोळपे या एकमेव कर्मचार्‍याला घटनास्थळी पाठवून आपल्या बेजबाबदारपणाचे व ‘अर्थ’पूर्ण संबंधाचे दर्शन घडविले. पोलीसांच्या सहकार्यानेच हे अवैध धंदे सुरू असल्याची चर्चा घटनास्थळी सुरू होती. हा दारू अड्डा चालक पोलिसांना डब्बे आणि सर्वकाही पुरवतो असा सूर उपस्थित ग्रामस्थांमधून उमटत होता.

ग्रामपंचायत पदाधिकार्‍यांचे या अवैध धंद्यावर नियंत्रण हवे. यापूर्वी जवळपास पन्नास वर्षांपासून या गावात शांतता नांदत होती. राजकारणविरहीत सर्व नागरिक गुण्या-गोविंदाने नांदत होते. मात्र अलिकडच्या पाच-दहा वर्षात उक्कलगावच्या या सामाजिक एकोप्याला दृष्ट लागली अन् अवैध धंद्याचा सुळसुळाट झाला. ऐन प्राथमिक शाळा अन् माध्यमिक शाळेच्या गेटवरच दारूची दुकाने जनरल स्टोअर्ससारखी सताड उघडी राहत असतील तर चिमुकले कोणता आदर्श घेणार. यापूर्वी महसूलमंत्री ना. राधाकृष्ण विखे पा. यांना दारूबंदी संदर्भात निवेदन दिले होते. मात्र कारवाईच्या अगोदरच बातमी लिक होत असल्याने या अड्डा चालकांचे फावत होते.मात्र काल ग्रामस्थांच्या भावनांचा उद्रेक झाल्याने या अवैध धंद्यांचा पर्दाफाश होण्याच्या आशा निर्माण झाल्या असून लोकनियुक्त सरपंच व पोलीस पाटील या दोन्ही महिला आदिवासी समाजातील असून त्यांनी याबाबत ठोस पावले उचलण्याची अपेक्षा ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे.

वारंवार आवाज उठवूनही हे मुजोर दारू गुत्तेवाले कुणाच्या आश्रयाने हे अवैध धंदे खुलेआम करतात? या प्रश्नाचे उत्तर तमाम गावकर्‍यांना माहीत असूनही ‘ जादा बोलेगा तो कान काटेगा’ या भितीपोटी कुणी काही बोलत नाही. या अवैध धंद्यांविरोधात आवाज उठवून कायमस्वरुपी दारूबंदीसाठी आजच्या मासीक सभेत सदस्य प्रश्न उपस्थित करणार असून शुक्रवारी विशेष ग्रामसभेचे आयोजन करून दारूबंदीचा ठराव करण्यात येणार असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. असे झाल्यास उक्कलगावच्या इतिहासातील हा सुवर्णक्षण ठरेल.

रात्री उशीरा दारू बंदी व उत्पादन शुल्क खात्याने वडार वाड्यातील एका दारू अड्डा चालकाच्या घरात धाड टाकून लाखोंची देशी भिंगरी दारू व बिअरचे बॉक्स जप्त केले. हे महिलांच्या आक्रमकपणाचे यश असून हे दारू अड्डा चालक विसर पडून पुन्हा आपले डोके वर काढतील, त्यांना गावातूनच पाठबळ मिळेल अशी चर्चा गावात सर्वत्र दबक्या आवाजात सुरू होती.

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या