श्रीरामपूर |प्रतिनिधी| Shrirampur
तालुक्यातील उक्कलगाव-कोल्हार रोडवरील लम्हणबाबा परिसरातील हर्षद चांगदेव वाबळे हा बिबट्याच्या हल्ल्यातून बालंबाल बचावला. ही घटना लम्हणबाबा रोडवरील शिंदे वस्ती नाजिक घडली.
हर्षद वाबळे हे काल रात्री साडेसात वाजण्याच्या दरम्यान गावातून घरी जात असताना सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ थोरात यांच्या उसाजवळील शेडजवळ दबा धरून बसलेल्या दोन बिबट्यापैकी एका बिबट्याने गाडी जवळ आल्यानंतर झडप मारली. प्रसंगावधान राखत हर्षदने गाडी जोरात काढली. त्यामुळे गाडीच्या आवाजाने दोन्ही बिबट्यांनी तेथून जगधने यांच्या कपाशीच्या शेतात धूम ठोकली. दरम्यान बिबट्याच्या अचानक झालेल्या हल्ल्याने गडबडलेला हर्षद गाडी टाकून शेजारील शिंदे वस्तीकडे पळाल्याने तो बालंबाल बचावला.
दरम्यान, उक्कलगाव परिसरात बिबट्याची संख्या मोठ्या प्रमाणात असून शेतकरी रात्री शेतात जाण्यासाठी घाबरत आहेत. विजेचा लपंडाव आणि पाऊस गायब असल्याने पिके जळून गेली असताना त्यात आणखी बिबट्याचे भर पडल्याने शेतकरी आक्रमक झाले आहे. वनखात्याच्या कोपरगाव येथील कार्यालयासमोर उपोषण करून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी करणार असल्याचा इशारा सोसायटीचे चेअरमन राजाभाऊ थोरात, मराठा महासंघाचे तालुका अध्यक्ष दिलीप थोरात, रवी थोरात, प्रकाश थोरात, बापू थोरात, हर्षद वाबळे यांनी दिला आहे.