नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरोधात कठोर पावले उचलली आहे. त्यातच घाबरलेल्या पाकिस्तानने संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेची बैठक घेण्याची मागणी केली. त्या मागणीवरून UNSC ची बंद दाराआड बैठक झाली. पाकिस्तान सध्या संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचा अस्थायी सदस्य आहे. त्यांनीच अण्वस्त्रधारी शेजाऱ्यांमधील परिस्थितीवर बंद दाराआड चर्चा करण्याची विनंती केली होती. पाकिस्तानच्या विनंतीवरून ही बैठक बोलावण्यात आली होती, परंतु बैठकीनंतर, परिषदेने किंवा कोणत्याही देशाने या विचारमंथनाबाबत कोणतेही निवेदन जारी केलेले नाही. त्याउलट संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या इतर सदस्यांनी जे कठीण सवाल उपस्थित केले त्यातून पाकिस्तानची बोलती बंद झाली.
मिळालेल्या माहितीनुसार, UNSC च्या बैठकीत सदस्यांनी २२ एप्रिलला झालेल्या पहलगाम हल्ल्याचा निषेध करत त्याची जबाबदारी निश्चित करण्याची मागणी केली. पर्यटकांना धर्माच्या आधारे टार्गेट करण्याचा मुद्दा उचलण्यात आला. अनेक सदस्यांनी पाकिस्तानकडून मिसाईल चाचणी आणि अणुहल्ल्याच्या धमकीने तणाव वाढल्याची चिंता व्यक्त केली. पाकिस्तानला द्विपक्षीय पद्धतीनेच हा मुद्दा सोडवण्याचा सल्ला इतर सदस्यांनी दिला.
जगातील अनेक देशांसमोर पाकिस्तानचा अपमान झाल्यानंतर मे महिन्यासाठी परिषदेचे अध्यक्ष असलेल्या ग्रीसने सोमवारी दुपारी बैठकीचे नियोजन केले होते. विशेष म्हणजे सोमवारी बंद दाराआड बैठकही संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या (UNSC) चेंबरमध्ये झाली नाही. सल्लागार कक्षात १५ देशांच्या सुरक्षा परिषदे प्रतिनिधींची बैठक सुमारे दीड तास चालली.
या बैठकीत पाकिस्तानला UNSC कडून फार अपेक्षा होती. या बैठकीत खोटा बनाव सदस्य मान्य करतील असे पाकिस्तानला वाटत होते. परंतु तसे काही झाले नाही. बंद खोलीत झालेल्या चर्चेनंतर सुरक्षा परिषदेकडून निवेदन जारी केले जाईल असेही पाकिस्तानला वाटत होते. परंतु तेही घडले नाही.यूएनएससीने कुठलेही निवेदन जारी न केल्याने पाकिस्तान तोंडघाशी पडल्याचे पहायला मिळाला.
या बैठकीत बंद दाराआड काय चर्चा झाली याची कोणतीही माहिती संयुक्त राष्ट्राकडून जाहीर केली जात नाही. भारत संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेमध्ये पूर्णवेळ किंवा अस्थायी सदस्य नसल्यामुळे या बैठकीसाठी भारताचे प्रतिनिधी उपस्थित नसतात. त्यामुळे इतर सदस्य राष्ट्रांकडूनच भारताला या बैठकीतील चर्चेसंदर्भातील माहिती मिळू शकेल.
या बैठकीत पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यात आला. काही सदस्यांनी विशेषतः पर्यटकांना त्यांच्या धार्मिक श्रद्धेच्या आधारावर लक्ष्य करण्याचा मुद्दा उपस्थित केला. या बैठकीत भारतासोबत द्विपक्षीयपणे मुद्दे शोधण्याचा सल्ला देण्यात आल्याचे वृत्त एका खासगी वृत्तसंस्थेकडून देण्यात आले. त्यामुळे भारताविरोधात आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर कांगावा करण्याचा पाकिस्ताना प्रयत्न फसल्याचे स्पष्ट झाले आहे.
दरम्यान, संयुक्त राष्ट्रप्रमुखांनी बैठकीआधी दिलेल्या प्रतिक्रियेवरून चर्चेसंदर्भात अंदाज लावले जात आहेत. “सध्याच्या अत्यंत तणावपूर्ण परिस्थितीत कोणत्याही प्रकारे लष्कराचा वापर झाल्यास परिस्थिती वेगाने नियंत्रणाबाहेर जाऊ शकते. त्यामुळे या स्थितीत लष्कराचा वापर टाळणेच योग्य ठरेल”, असे अँटोनियो गुटेरेस म्हणाले आहेत. “युद्धाच्या काठावर स्थिती पोहोचलेली असताना तिथून मागे सरकणे आणि आक्रमकतेला अधिकाधिक आळा घालणे आवश्यक आहे. भारत व पाकिस्तान या दोन्ही देशांशी झालेल्या चर्चेदरम्यान मी हाच संदेश दिला आहे. युद्धाचा पर्याय हा योग्य पर्याय ठरणार नाही यात अजिबात शंका नाही”, असेही गुटेरेस यांनी नमूद केले.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा