करंजी |वार्ताहर| Karnaji
पाथर्डी तालुक्यातील कडगाव येथून मिरी मार्गे नगरकडे कोळशाच्या 80 गोण्या घेऊन अनधिकृतपणे प्रवास करणार्या ट्रकसह चालकास ताब्यात घेऊन संबंधित व्यक्तीच्या विरोधात तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकार्यांनी कायदेशीर कारवाई केली आहे.
दोन दिवसापूर्वी कडगाव येथून अनाधिकृतपणे कोळसा पाडून तो गोण्यामध्ये भरून एक ट्रक मिरी मार्गे नगरकडे जात असल्याची माहिती तिसगाव वनपरिक्षेत्र अधिकारी दादासाहेब वाघुलकर यांना समजली. त्यानंतर वनपाल सचिन थोरात, स्वप्निल निलाखे, मुबारक शेख, वनरक्षक कानिफ वांढेकर यांनी सापळा रचून रात्रीच्या सुमारास कोळशाची वाहतूक करणारा ट्रक मिरी गावाजवळ पकडून संबंधित व्यक्ती विरोधात कायदेशीर कारवाई करत चालकासह हा ट्रक ताब्यात घेतला आहे.
या ट्रकमध्ये 80 गोण्या कोळसा भरलेला असून लाखो रुपयांचा हा कोळसा या ट्रकमध्ये आढळून आला. तिसगाव वनपरिक्षेत्र विभागाने सुरू केलेल्या या धडक कारवाईमुळे अनाधिकृतपणे कोळसा पाडणार्या व्यापार्यांमध्ये खळबळ उडाली असून पाथर्डी बरोबरच तिसगाव वनपरिक्षेत्र विभाग देखील आता कोळशाची वाहतूक करणार्यावर लक्ष ठेवून आहे.