अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
उमेदवार बिनविरोध निवडून आला म्हणून मतदारांचा नकाराधिकार संपतो का? असा थेट आणि घटनात्मक सवाल उपस्थित करत येथील नागरिक दिगंबर लक्ष्मण गेंट्याल यांनी राज्य निवडणूक आयोग आणि महापालिका आयुक्त तथा निवडणुकीचे मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी यशवंत डांगे यांच्याकडे लेखी निवेदन सादर केले आहे. महापालिका निवडणुकीत बिनविरोध निवड झालेल्या पाच उमेदवारांनाही मतदारांनी ‘नोटा’व्दारे नकार देण्याचा अधिकार मिळावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.
2013 साली सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या ऐतिहासिक निर्णयाचा दाखला देत, मतदारांना उमेदवार नकाराधिकार हा मूलभूत आणि घटनात्मक अधिकार असल्याचे गेंट्याल यांनी आपल्या निवेदनात स्पष्ट केले आहे. तत्कालीन मुख्य न्यायाधीश पी. सत्यशिवम यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठाने हा अधिकार मान्य केल्यानंतर निवडणूक आयोगाने ईव्हीएममध्ये ‘नोटा’ बटणाची तरतूद केली, हेही त्यांनी अधोरेखित केले. अहिल्यानगर महापालिकेत पाच नगरसेवक बिनविरोध निवडून आल्याची घोषणा करण्यात आली आहे.
उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी विरोधात कोणताही उमेदवार नसल्याने आयोगाने ही निवड जाहीर केली. ही प्रक्रिया कायदेशीर असली, तरी त्यातून मतदारांचा नकाराधिकार हिरावून घेतला जात असल्याचा आक्षेप गेंट्याल यांनी नोंदवला आहे. बिनविरोध निवड म्हणजे मतदारांची संमती नव्हे, असे ठाम मत व्यक्त करत, त्या-त्या प्रभागातही ईव्हीएमवर उमेदवाराचे नाव व चिन्ह ठेवून ‘नोटा’चा पर्याय उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे. अन्यथा मतदारांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागतील, अशी सूचक इशाराही निवेदनात देण्यात आली आहे.




