Sunday, September 15, 2024
Homeनगरआमदार थोरातांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसला मोठे यश

आमदार थोरातांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेसला मोठे यश

तेरा उमेदवार मोठ्या मताधिक्याने लोकसभेला झाले विजयी

संगमनेर |प्रतिनिधी| Sangamner

- Advertisement -

महाविकास आघाडीमधील प्रमुख नेते व काँग्रेस विधिमंडळ पक्षनेते आमदार बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वात काँग्रेस पक्षाने लोकसभा निवडणुकीत जोरदार मुसंडी मारली असून 13 जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळवला आहे. तर उत्तर महाराष्ट्रातून घवघवीत यश मिळाले असून आठपैकी सहा जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. अठराव्या लोकसभेच्या निवडणुकीसाठी मोठी राजकीय धामधूम झाली. भाजपने चारशे पारचा नारा दिल्यानंतर इंडिया आघाडीने देशभरात राहुल गांधींच्या नेतृत्वाखाली जोरदार मुसंडी मारली. महाराष्ट्रामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडीची लढत झाली.

ज्येष्ठ नेते शरदचंद्र पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व काँग्रेस नेते आमदार बाळासाहेब थोरात, नाना पटोले, जयंत पाटील, पृथ्वीराज चव्हाण, खासदार संजय राऊत यांच्या प्रमुख नेतृत्वात महाविकास आघाडीने 30 जागा जिंकल्या आहेत. यासाठी आमदार बाळासाहेब थोरात यांनी विदर्भात नागपूर, गडचिरोली, रामटेक, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर तर मराठवाड्यात नांदेड, परभणी, हिंगोली, जालना, औरंगाबाद, बीड, पश्चिम महाराष्ट्रात कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा, पुणे, शिरूर, हातकणंगले, मुंबई, ठाणे, पालघर याठिकाणी जोरदार प्रचार सभा घेतल्या. त्याचबरोबर उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी सांभाळताना जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक दिंडोरी, अहमदनगर व शिर्डी मतदारसंघातही जोरदार प्रचार यंत्रणा राबवली.

उत्तर महाराष्ट्राची जबाबदारी आमदार थोरात यांच्यावर असताना त्यांनी अत्यंत काटेकोरपणे प्रचाराचे नियोजन करून आपली यंत्रणा कामाला लावली. यामुळे आठ पैकी सहा जागांवर मविआला मोठे यश मिळाले आहे. नंदुरबारमधून काँग्रेसचे अ‍ॅड. गोवाल पाडवी हे सर्वात मोठ्या मताधिक्याने विजयी झाले आहेत. तर धुळ्यामधून माजी मंत्री डॉ.शोभा बच्छाव विजयी झाल्या आहेत. संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून असलेल्या अहमदनगर दक्षिणमध्ये जायंट किलर ठरलेले नवनिर्वाचित खासदार नीलेश लंके हे डॉ. सुजय विखे पाटील यांचा पराभव करून विजयी झाले. याचबरोबर शिर्डीमधून भाऊसाहेब वाकचौरे यांनी विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे यांचा पराभव केला. शिर्डी व अहमदनगरमध्ये आमदार थोरातांची प्रचार यंत्रणा मोठ्या पद्धतीने काम करत होती.

नाशिकमधून राजाभाऊ वाजे हे विक्रमी मतांनी निवडून आले. तर दिंडोरीमधून भास्कर भगरे हे निवडून आले. हे सहा उमेदवार निवडून आणण्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गट आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, विविध पुरोगामी पक्ष यांचे कार्यकर्ते, पदाधिकारी व नेते यांनी मोठे परिश्रम घेतले. या सर्वांना मार्गदर्शन करून प्रचाराचे काटेकोर नियोजन करणारे आमदार बाळासाहेब थोरात या विजयाचे शिल्पकार ठरले आहेत. त्यांच्या नेतृत्वात राज्यात काँग्रेस पक्षाला 13 जागांवर मोठ्या मताधिक्याने विजय मिळाला आहे. महाविकास आघाडीच्या उमेदवारांच्या विजयात मोलाचा वाटा उचलणारे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते व जनतेचे आमदार बाळासाहेब थोरात यांनी कौतुक केले आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या