येवला | प्रतिनिधी
बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन (स्मार्ट) प्रकल्पाअंतर्गत पणन संचालनालयाकडून राज्यातील सुमारे ३०५ कृषी उत्पन्न बाजार समित्यांची सन २०२२-२३ या आार्थिक वर्षात तपासणी केली असता उत्कृष्ठ कामगिरीच्या आधारावर वार्षिक क्रमवारी नुकतीच जाहिर करण्यात आली आहे.यामध्ये येवला कृषी उत्पन्न बाजार समितीला राज्यात १३ वा क्रमांक आला असून नाशिक विभागात ७ वा तर जिल्ह्यात ४ थ्या क्रमांकाचे मानांकन प्राप्त झाले आहे.
नाशिक जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था यांचे मार्गदर्शनानुसार सहाय्यक निबंधक येवला व लेखापरिक्षक यांचे मार्फत शेतमाल विक्री व्यवस्थेमध्ये बाजार समितीत उपलब्ध असलेल्या पायाभूत सुविधा,आर्थिक निकष,समितीचे सुरु असलेले वैधानिक कामकाज व इतर असे एकूण ३५ निकषांची तपासणी करुन २०० गुणांपैकी उपलब्ध असलेल्या इतर सुविधांनुसार १४६ गुण प्राप्त झाले असून महाराष्ट्र राज्यात १३ वा, नाशिक विभागात ७ वा तर नाशिक जिल्ह्यात ४ था क्रमांक पटकाविण्यात बाजार समितीला यश मिळाले आहे.
पहिल्या २० मध्ये स्थान मिळाल्याने याबाबत बाजार समितीचे सभापती किसन धनगे व सचिव के.आर.व्यापारे यांनी समाधान व्यक्त केले.यापुढील काळातही शेतकरी व व्यापारी यांना आवश्यक त्या नागरी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येईल असे कार्यालयाच्या वतीने सांगितले आहे.
यशस्वी उपक्रमाबद्दल बाजार समितीचे तालुक्यात शेतकरी वर्गातून अभिनंदन करण्यात येत आहे.या कामगिरीत संचालक मंडळ,शेतकरी वर्ग,व्यापारी,हमाल,मापारी तसेच कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी यांचे विशेष सहकार्य लाभले आहे.