नाशिक | प्रतिनिधी
केंद्र सरकारच्या ‘पीएम विश्वकर्मा’ योजनेअंतर्गत राज्यातील १८ प्रकारच्या पारंपारिक कारागिरांना आता बँकेतून अर्थसहाय्य मिळणार आहे. प्रथम वर्षासाठी एक लाखाचे कर्ज ५% इतक्या कमी व्याजदाराने व त्याची परतफेड केल्यानंतर २ लाख रुपये कर्ज तेही ५% इतक्याच व्याजदराने असे एकूण तीन लाखांपर्यंत कमी व्याजदराने कर्ज हे लाभार्थ्यांना मिळेल.
या कर्जाला कोणत्याही प्रकारची बँक गॅरंटी लागत नाही, हे योजनेचे ग्रामपंचायत यांच्या माध्यमातून होणार आहे, तर द्वितीय पडताळणी ही जिल्हा स्तरावरून यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतर लाभार्थ्यांना पीएम विश्वकर्मा प्रमाणपत्र व ओळखपत्र दिले जाणार आहे.
त्यानंतर लाभार्थी हे आपल्या जवळील प्रशिक्षण केंद्रावर प्रशिक्षण नोंदणी करू शकतात. हे प्रशिक्षण ५ दिवसांचे असून प्रशिक्षणादरम्यान प्रशिक्षणार्थीना दररोज ५०० रुपये प्रमाणे भत्ता दिला जाणार आहे. प्रशिक्षण यशस्वीरित्या पूर्ण केल्यानंतर उपकरणे खरीदेसाठी १५ हजार रुपये इतकी आर्थिक मदत दिली जाणार आहे. यानंतर लाभार्थी हे व्यवसायाच्या उभारणीसाठी कर्जाची मागणी करू शकतात.
नाशिक जिल्ह्यातील १३८८ ग्रामपंचायतीतील सरपंच यांची नोंदणी सुरू असून यापैकी १२५६ ग्रामपंचायतीतील सरपंच यांची नोंदणी पीएम विश्वकर्मा पोर्टलवर करण्यात आली आहे. सरपंच नोंदणीमध्ये राज्यातील सर्वाधिक नोंदणी नाशिक जिल्ह्यात झाल्या असल्याची माहिती ग्रामपंचायत विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.वर्षा फडोळ यांनी दिली. या योजनेचा लाभ मिळवण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिकांनी देखील सीएससी सेंटरमध्ये जाऊन नोंदणी करावी. असे आवाहन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल यांनी केले आहे.