नितीन कुलकर्णी, क्रीडा क्षेत्राचे अभ्यासक
क्रिकेट मैदानावरचा आक्रमक फलंदाज विराट कोहलीने कसोटी संंघाचे कर्णधारपद सोडले. अर्थात, हे कर्णधारपद तो सन्मानपूर्वक सोडेल, असे वाटत होते. परंतु गेल्या दोन-तीन वर्षांची स्थिती पाहता त्याची पीछेहाट होण्यामागे अपयश नसून आक्रमकता आहे. खेळाच्या मैदानावर त्यांच्या कामगिरीपेक्षा आक्रमकपणाचीच चर्चा होऊ लागली. एकीकडे बॅटमधून धावा निघत नसल्याने आणि संघाच्या अपयशाचे ओझे दिवसेंदिवस वाढत चालल्याने त्याने कसोटी संघाच्या कर्णधारपदाची झूल बाजूला काढून ठेवणे हे श्रेयस्कर समजले.
राट कोहलीने सोशल मीडियावर एक पोस्ट करत कसोटी संघाचे कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. अर्थात, अशा प्रकारची चर्चा दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वीच केली जाऊ लागली होती. भारताने विराटच्या नेतृत्वाखाली 69 कसोटी सामने खेळले आणि पैकी 40 सामन्यांत विजय तर 17 कसोटी सामने गमावले. तसेच 11 सामने अनिर्णीत राहिले. प्रत्यक्षात एखाद्या कर्णधाराच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने एवढ्या मोठ्या संख्येने विजय मिळवलेले नाहीत. त्याचवेळी विराटने 95 एकदिवसीय सामन्यांत टीम इंडियाचे नेतृत्व केले. पैकी 65 सामन्यांत भारताने विजय मिळवला आहे. एकदिवसीय सामन्यात महेंद्रसिंह धोनी (110), मोहंमद अझरुद्दीन (90), सौरभ गांगुली (76) यांनी भारताला सामने जिंकून दिले आहेत. परंतु यापैकी एकाचीही विजयाची सरासरी 70 टक्क्यांपेक्षा अधिक राहिलेली नाही. आकडेवारीच नाही तर परदेशातील खेळपट्टीवरही विराटच्या संघाने मिळवलेले यश नेत्रदीपक असून ते त्याच्या सरस कामगिरीचे प्रतीक आहे. म्हणून ज्या रीतीने विराटने कसोटीचे कर्णधारपद सोडले, त्यापेक्षा कैक पटीने सन्मानाने त्याला सोडता आले असते, कारण तो त्यास पात्र होता.
भारतीय क्रिकेटमध्ये विराट कोहलीचे योगदान नाकारण्यासारखे नाही. त्याने आयसीसी टुर्नामेंटमध्ये संघाला विजेतेपद मिळवून देऊ शकले नसले किंवा आयपीएलमध्ये आपल्या टीमला विजयी करू शकला नाही तरी या निकषावर त्यांचे मूल्यमापन करणे चुकीचे राहूू शकते. 2014 च्या ऑस्ट्रेलिया दौर्यात कोहलीची कर्णधारपदाच्या रूपातून एन्ट्री ही फारशी धमाकेदार राहिली नव्हती. धोनी जखमी झाल्याने अॅडलेड कसोटीत कर्णधारपद भूषवणार्या कोहलीने वेगवान चेंडूचा सामना करताना दोन्ही डावात शतक ठोकले. दुसर्या बाजूने फलंदाजांची थोडी तरी साथ मिळाली असती तर कोहली हा पहिल्याच कसोटीत इतिहास घडवू शकला असता. उर्वरित कसोटीतही कोहलीने दमदार छाप पाडली. मालिकेच्या शेवटच्या टप्प्यात धोनीने कर्णधारपद सोडण्याची घोषणा केली. त्यावेळी भारतीय कसोटी संघ हा सातव्या रँकवर हेाता. परंतु विराट कोहलीने काही काळातच संघाला जगातील नंबर वनचा संघ म्हणून नावारूपास आणले. हा मान सुमारे साडेतीन वर्षे राहिला. कोहलीने घरच्या आणि परदेशातील मैदानावर प्रतिस्पर्धी संघाला धूळ चारण्यास शिकवले. हीच आक्रमकता खेळात आणि सहकारी खेळाडूंबरोबरही दिसत होती.
भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तो एक यशस्वी कर्णधार म्हणून ओळखला जातो. कोहलीचे दुसरे सर्वात मोठे योगदान म्हणजे वेगवान गोलंदाजाचे. त्याने सूत्रे सांभाळण्यापूर्वी फलंदाजी हा भारतीय संघाचा कणा मानला जात होता. परंतु कोहलीने कर्णधारपदी असताना वेगवान गोलंदाजाची फळी तयार केली. या आधारावर संघाने दमदार यश मिळवले. पण गेल्या दोन वर्षांत कोहलीच्या खासगी आणि व्यावसायिक आयुष्यात बदल झाला. भारतीय संघाच्या कर्णधारपदाचा दबाव हा त्याच्या फलंदाजीवर पडू लागला. बॅटमधून पूर्वीसारख्या धावा निघत नसल्याचे दिसून आले. वास्तविक हीच त्याची खरी ओळख होती.
ज्येष्ठ क्रिकेट पत्रकार सी. शेखर लुथरा सांगतात की, ज्या दिवशी विराट कोहलीने सार्वजनिक रूपात बीसीसीआयविषयी वेगळे सूर आळवण्यास सुरुवात केली, टी-20 संघाच्या कर्णधारपदावरून बाजूला केल्याने जो राग व्यक्त झाला तो स्वाभाविक होता. परंतु त्यांच्याबद्धल चुकीचे आडाखे बांधले गेलेे. विराट आज ना उद्या कर्णधारपदावरून जाणारच होता. एखादा खेळाडू किंवा कर्णधारपेक्षा संघ, देश मोठा असतो, हे विसरता येणार नाही. आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका पराभूत झाल्यानंतर विराटला कर्णधारपदावरून हटवण्यात आले असते. पण यादरम्यान त्याने बाजूला होण्याची घोषणा केली. यादरम्यान आणखी एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आणि ती म्हणजे दोन वर्षांपासून कोहलीची बॅट तळपलेली नाही. विराट कोहलीने ज्या 68 कसोटी सामन्यांत भारताचे नेतृत्व केले, त्यात त्याने 20 शतके ठोकली आहेत. हादेखील एकप्रकारचा विक्रमच मानावा लागेल. कोहलीने आपल्या कर्णधारपदावरून गेल्या सात वर्षांत भारतीय संघाची दमदार बांधणी केली होती. यावरून एक अंदाज बांधता येईल की, कोहलीच्या कर्णधारपदाच्या नेतृत्वाखाली ऑगस्ट 2016 ते मार्च 2020 पर्यंत भारत कसोटीत सलग 42 महिने म्हणजेच साडेतीन वर्षांपर्यंत अव्वल स्थानी होता.
अर्थात, विराट कोहलीला अजून खूप खेळायचे आहे. गेल्या दोन वर्षांत त्याने एकही शतक ठोकलेले नसले तरी तो सातत्याने धावा काढत आहे. धावांसाठी तो धडपड करताना दिसत नाही. आजही सचिनचा शंभर शतकांचा विक्रम मोडण्यासाठी मोठा दावेदार मानला जातो; परंतु यासाठी त्याला संघात स्थान टिकवावे लागेल. चांगली कामगिरी करावी लागेल. त्याला कर्णधाराबरोबर ताळमेळ बसवावा लागेल. एक खराब मालिकादेखील त्याला संघाबाहेरचा रस्ता दाखवण्यास पुरेशी आहे. तांत्रिक पातळीवर तो अजूनही दोन ते तीन वर्षांपर्यंत खेळू शकतो. परंतु एक ब्रँड म्हणून त्याचे मूल्य कमी होऊ शकते. अर्थात, हे मूल्य त्याच्या बॅटवर अवलंबून आहे.
कर्णधारपदाच्या राजीनाम्याची घोषणा करताना विराटने ट्विटरवर लिहिलेले एक वाक्य त्याच्या कामगिरीचे चित्र स्पष्ट करते. यात तो म्हणतो की, जेव्हा मला वाटते की संघाला 120 टक्के योगदान देऊ शकत नाही तेव्हा मागे राहणे योग्य ठरेल. कोहलीची आक्रमकता, मैदानावरच्या नेतृत्वाची शैली यावरून आपण अहसमत राहू शकता; परंतु संघाला विजय मिळवूून देण्यासाठी त्याचा झुंजारपणा, प्रयत्न यावर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही. हीच गोष्ट कोहलीची वैशिष्ट्यपूर्ण आहे. सुनील गावस्कर, सचिन तेंडुलकर यांनी आपल्या फलंदाजीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी कर्णधारपद सोडले.
कोहली पण आता त्याच मार्गावर जात आहे. त्यामुळे फलंदाज म्हणून चांगली कामगिरी करण्यासाठी त्याच्यावर दबाव असेल. टीम इंडिया सध्या बदलाच्या प्रक्रियेतून जात आहे. त्याचवेळी पिढीतील बदलातूनही. टी-20 आणि एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदासाठी विराटनंतर रोहित शर्मा हा एक चांगला पर्याय म्हणून समोर आला होता. परंतु कसोटीसाठी हा निकष लागू होत नाही. रोहितशिवाय के.एल. राहुलपासून ऋषभ पंतपर्यंत अनेक नावांची चर्चा आहे. अजूनतरी त्यात कोणतीही स्पष्टता नाही. सुनील गावसकरच्या काळात कपिल देववरून चर्चा होती. धोनीनंतर कोहलीच्या खांद्यावर धुरा टाकण्यात आली. कोहली आणि रवी शास्त्रीच्या युगाचा अस्त झाल्यानंतर आता भारतीय निवड समितीला आणि प्रशिक्षक राहुल द्रविडला संघासाठी केवळ नवीन कर्णधार निवडून चालणार नाही तर रोहित शर्माचा उत्तराधिकारी पण निवडावा लागेल. अर्थात, ही बाब वाटते तेवढी सोपी नाही.