Thursday, October 31, 2024
Homeशब्दगंधआरोग्य परीक्षेवर लादले गेलेले ‘अनारोग्य’

आरोग्य परीक्षेवर लादले गेलेले ‘अनारोग्य’

करोनाशी यशस्वीपणे दोन हात करणार्‍या राज्याच्या आरोग्य विभागाची प्रतिमा जनमानसात खूपच उंचावली. महसूल, गृह आदी विभागांइतकाच, किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचा आरोग्य विभाग आहे, याची जाणीव करोनाकाळात सर्वांना झाली. करोनाकाळातील चोख कामगिरीमुळे आरोग्य विभाग प्रसारमाध्यमांमध्ये सतत चर्चेत आणि प्रकाशझोतात होता. आता मात्र भरती प्रक्रियेतील सावळागोंधळाने तो गाजत आहे.

सरकारी नोकरी म्हणजे आयुष्यभराची निश्चिंती’ असा समज पूर्वापार रूढ आहे. साहजिकच सरकारी नोकरी मिळवण्यासाठी सुशिक्षित तरुणांचा खटाटोप नेहमीच सुरू असतो. निश्चित उत्पन्नाची खात्री म्हणून पालकसुद्धा पाल्यांना तसा आग्रह करीत असतात. सरकारी खात्यात पदभरती निघाल्यावर नोकरीसाठी बेरोजगारांच्या उड्या कदाचित त्यामुळेच पडत असाव्यात, पण सरकारी नोकरी मिळवणे आता सोपे राहिलेले नाही आणि खात्रीसुद्धा दिवसेंदिवस कमी होणार आहे, असे सरकारने अलीकडच्या काळात स्वीकारलेल्या धोरणावरून जाणवते.

सरकारी नोकरीसाठी इच्छुकांना स्पर्धा परीक्षांच्या अग्निदिव्यातून जावे लागते. एका प्रयत्नात यश मिळेलच असे नाही. अनुकूल निकाल लागेपर्यंत चांगला अभ्यास करून पुन:पुन्हा प्रयत्न करावे लागतात. तेव्हा कुठे यश मिळते. तथापि सरकारी नोकर्‍या आता खूपच कमी झाल्या आहेत. नोकर्‍यांच्या तुलनेत इच्छुकांची संख्या मात्र कैकपट वाढली आहे. परिणामी स्पर्धा परीक्षांना बसणार्‍या उमेदवारांच्या संख्येत सतत वाढ होत आहे.

- Advertisement -

करोनाकाळातील चोख कामगिरीमुळे राज्याचा आरोग्य विभाग प्रसारमाध्यमांमध्ये सतत चर्चेत आणि प्रकाशझोतात होता. आता तो भरती प्रक्रियेतील सावळागोंधळाने गाजत आहे. करोना संकटापासून बोध घेऊन राज्य सरकारने आरोग्य विभागाला रिक्त पदे शंभर टक्के भरण्याची परवानगी दिली आहे.

त्यानुसार रिक्त पदे तातडीने भरण्याचा निर्णय आरोग्य विभागाने घेतला. परीक्षा घेण्याची जबाबदारी एका खासगी कंपनीवर सोपवण्यात आली. आरोग्य विभागात ‘क’ गटातील विविध प्रकारची 2,725 तर ‘ड’ गटातील 3,466 पदे रिक्त आहेत. ही पदे भरण्यासाठी दोन टप्प्यांत परीक्षा घेण्याचे ठरवले गेले. भरतीची जाहिरात प्रसिद्धही झाली. त्यानंतर पहिल्या टप्प्यातील परीक्षा गेल्या रविवारी पार पडली. 4 लाखांहून जास्त उमेदवारांची परीक्षेसाठी अर्जनोंदणी झाली. 17 जिल्ह्यांतील एक हजाराहून जास्त केंद्रांवर परीक्षा घेतली गेली. प्रवेशपत्र आणि इतर कारणांनी आधीच बहुचर्चित ठरलेल्या या भरती परीक्षेला पहिल्या टप्प्यात पुन्हा गोंधळाचेच ग्रहण लागले.

राज्यातील अनेक परीक्षा केंद्रांवर वेगवेगळा गडबडगोंधळ झाल्याचे दिसून आले. मुंबईतील एका केंद्रावर नर्सिंग आणि पॅरामेडिकलचा पेपर फुटल्याची ओरड परीक्षार्थींनी केली. शेकडो जणांनी परीक्षा केंद्राबाहेर ठिय्या आंदोलन आरंभले. पुण्यातील आझम कॅम्पस येथील केंद्रावर प्रश्नपत्रिकाच नव्हे तर पर्यवेक्षकदेखील पोहोचले नव्हते, असे सांगण्यात आले.

नाशिकमधील चित्र अभूतपूर्व होते. गिरणारे येथील केंद्रावर परीक्षार्थींच्या संख्येपेक्षा कमी प्रश्नपत्रिका पोहोचल्या. केटीएमएम केंद्रावरील परीक्षार्थींना तर त्यांनी अर्ज केलेल्या पदाऐवजी दुसर्‍याच पदाच्या प्रश्नपत्रिका दिल्या गेल्या. हा प्रकार तासाभराने लक्षात आला. त्यामुळे परीक्षार्थींनी दुपारच्या सत्रातील परीक्षा न होऊ देण्याचा आक्रमक पवित्रा घेतला. त्यातून परीक्षा केंद्रावर काही काळ तणावपूर्ण स्थिती निर्माण झाली होती.

24 ऑक्टोबरला झालेल्या परीक्षेचे पेपर फुटल्याची ओरड केवळ अफवा आहेत, 10 केंद्रांवर झालेले काही प्रकार वगळता आरोग्य विभागाच्या परीक्षा सुरळीत पार पडल्याचे राज्य सरकारकडून सांगण्यात आले. 24 ऑक्टोबरला झालेल्या परीक्षेतील गडबडगोंधळाबाबतचा अहवाल आरोग्य विभागाकडे पोहोचला असावा.

कारण आता आरोग्यसेवा आयुक्तालयाने परीक्षा प्रक्रिया राबवणार्‍या कंपनीला परीक्षेतील गोंधळाबाबत जाब विचारणारे पत्र पाठवल्याची बातमी आहे. त्या पत्रात परीक्षेची जबाबदारी सोपवलेल्या खासगी कंपनीने परीक्षेदरम्यान अक्षम्य चुका केल्याचा ठपका आयुक्तालयाने ठेवल्याचे सांगितले जाते. त्यामुळे भरती परीक्षेबाबत राज्य सरकार नेमकी काय भूमिका घेते, ते पाहावे लागेल.

खरे तर ही परीक्षा सप्टेंबर महिन्यात होणार होती, पण त्याआधीच प्रवेशपत्रांतील गडबडगोंधळ उजेडात आला. अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्रांत चुकी, परीक्षा केंद्राचा पत्ता नसणे, चुकीची छायाचित्रे, अतिशय दूरच्या अंतरावरील परीक्षा केंद्रे आदींमुळे परीक्षार्थींमध्ये संभ्रम निर्माण झाला होता. त्याचवेळी परीक्षार्थींनी अनेक शंका उपस्थित केल्या होत्या. आरोग्य विभागापर्यंत त्याची माहिती पोहोचल्यावर संभाव्य गोंधळ टाळण्यासाठी नियोजित तारखेला होणारी ही परीक्षा अखेर स्थगित करण्यात आली. भरती परीक्षा पारदर्शी पद्धतीनेच होईल, असे आश्वासन आरोग्यमंत्र्यांनी तेव्हा दिले होते.

त्यानंतर आरोग्य संचालकांनीदेखील नाशकात पत्रकार परिषद घेतली व परीक्षा पारदर्शी होण्याची ग्वाही दिली होती. आरोग्यमंत्री आणि आरोग्य संचालकांनी दिलेली ग्वाही व व्यक्त केलेला विश्वास फोल ठरवण्याचे काम परीक्षा घेणार्‍या कंपनीने आपल्या नियोजनातील उणिवांमधून चोखपणे बजावण्याचे सूर उमटत आहेत. परीक्षेवेळी अनेक ठिकाणी उडालेला गोंधळ पाहता घेतलेली परीक्षा रद्द करावी, अशी मागणी परीक्षार्थींकडून त्याच दिवशी केली गेली. अजूनही होत आहे. परीक्षेत गोंधळ झाल्याचे आरोग्य विभागानेही मान्य केले आहे.

करोनाकाळात राज्याच्या आरोग्य विभागाने आघाडीवर राहून कर्तव्यतत्परता दाखवली. बाधित झालेल्या लाखो नागरिकांना करोनामुक्त करण्याची चोख कामगिरी बजावली. लसीकरण अभियानातही आरोग्य विभाग प्रशंसनीय कामगिरी बजावत आहे. आरोग्यमंत्र्यांनी निर्भीडपणे स्वत: पुढे राहून आरोग्य विभागातील डॉक्टर आणि आरोग्य सेवकांना प्रेरीत केले. त्यांचा उत्साह टिकवला. महसूल, गृह आदी विभागांइतकाच, किंबहुना त्याहून जास्त महत्त्वाचा आरोग्य विभाग आहे याची जाणीव करोनाकाळात सर्वांना झाली. ‘क’ वर्ग पदांसाठी झालेल्या परीक्षेतील गोंधळामुळे आरोग्य विभागाची ती प्रतिमा काहीशी मलीन झाली आहे.

आरोग्य विभागाच्या भरती प्रक्रियेच्या दुसर्‍या टप्प्यात ‘ड’वर्ग पदांसाठी आज रविवारी परीक्षा होत आहे. ही परीक्षा कोणत्याही गडबड-गोंधळाविना सुरळीत पार पडावी, अशीच परीक्षेला बसलेल्या उमेदवारांची माफक अपेक्षा असेल.

तथापि तसे होण्याची चिन्हे नसल्याचे दुसर्‍या टप्प्यातील परीक्षेच्या प्रवेशपत्रांबाबत उघड झालेल्या गोंधळांवरून आताच स्पष्ट झाले आहे. परीक्षा तीन दिवसांवर असताना प्रवेशपत्रेच मिळाली नसल्याची तक्रार अनेक परीक्षार्थ्यांकडून करण्यात आली. एका उमेदवाराला एक-दोन नव्हे तर तब्बल 34 प्रवेशपत्रे मिळाल्याची बातमी बीडमधून आली आहे. ते कमी म्हणून की काय, मिळालेल्या प्रवेशपत्रांवर परीक्षा केंद्र आणि बैठक क्रमांक वेगवेगळी आढळली आहेत.

त्यामुळे परीक्षा नेमकी कोणत्या केंद्रावर वा कोणत्या क्रमांकावर द्यायची, अशा गोंधळात संबंधित परीक्षार्थी पडल्याचे त्या बातमीत म्हटले आहे. प्रवेशपत्राबाबतचा उजेडात आलेला हा प्रकार अपवादात्मक असेल, असे म्हणता येईल का? कदाचित इतर काही परीक्षार्थींबाबतही असे घडले असण्याची शक्यता आहे. पहिल्या टप्प्यात उघडकीस आलेल्या त्रुटी आणि ढिसाळ नियोजनातून झालेले हसे लक्षात घेता ते सर्व टाळून परिपूर्ण नियोजनाने दुसर्‍या टप्प्यातील परीक्षा पार पडाव्यात, याची खबरदारी राज्य सरकार आणि संबंधित कंपनीकडून घेतली गेली असेल का? की दुसर्‍या टप्प्यातही आणखी नव्या गोंधळाची भर पडेल?

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला सर्व प्रकारच्या पदभरतीसाठी स्पर्धा परीक्षा घेण्याचा प्रदीर्घ अनुभव आहे. किंबहुना सरकारी खात्यांतील पदभरती सुलभ आणि पारदर्शीपणे व्हावी म्हणून महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना करण्यात आली. परीक्षेसाठी नियोजनबद्ध आणि सक्षम व्यवस्था आयोगाने निर्माण केली आहे. महाराष्ट्र लोकसेवा आयोग परीक्षा घेऊन पात्र उमेदवारांची निवड करतो. आरोग्य विभागाच्या भरती परीक्षेतील अनुभव जमेस धरता भविष्यात राज्य सरकारच्या कोणत्याही विभागात भरती प्रक्रिया राबवताना खासगी कंपनीवर अवलंबून राहण्याचा अट्टाहास सोडून महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फतच परीक्षा प्रक्रिया राबवली जाईल का?

एन.व्ही. निकाळे

[email protected]

- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या