मुंबई | प्रतिनिधी Mumbai
भाजपचे शीर्षस्थ नेते व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा हे उद्या, शुक्रवारपासून दोन दिवसाच्या महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. उद्या, रात्री पुण्यातील मुक्कामानंतर शनिवारी ते रायगड किल्ल्याला भेट देणार आहेत. त्यानंतर अमित शहा मुंबईत आयोजित विविध कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. या दरम्यान, शहा हे महायुतीच्या नेत्यांशी चर्चा करणार असून या चर्चेत रायगड, नाशिक पालकमंत्रिपदाचा तिढा सोडवला जाण्याची शक्यता आहे.
मंत्री अमित शहा परवा, शनिवारी सकाळी साडेदहा वाजता पाचाड येथे राजमाता जिजाऊंच्या समाधीचे दर्शन घेतील. नंतर ११ वाजता ते रायगड किल्ल्याला भेट देतील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला ते वंदन करतील. नंतर किल्ल्यावर त्यांच्या उपस्थितीत काही कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. दुपारी २ वाजता ते राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार सुनील तटकरे यांच्या सुतारवाडी येथील निवासस्थानी भेट देणार आहेत. त्यानंतर दुपारी साडेतीन वाजता मंत्री शहा यांचे मुंबईत आगमन होईल. परवा रात्री ते सहयाद्री अतिथीगृह येथे येणार आहेत.
दरम्यान, महायुतीत नाशिक, रायगड पालकमंत्रिपदासह शासकीय महांडळांच्या वाटपावरून वाद आहे. याबाबत शहा हे भाजपसह शिवसेना शिंदे गट आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांशी चर्चा करून पालकमंत्री तसेच सरकारी महामंडळाच्या वादावर तोडगा काढण्याची शक्यता आहे.