मुंबई | प्रतिनिधी Mumbai
भाजपचे शीर्षस्थ नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे आज, रविवारपासून तीन दिवस महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. नागपूर, नांदेड आणि मुंबई असा त्यांचा तीन दिवसांचा दौरा आहे. या तिन्ही शहरात आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमांना उपस्थित राहण्याबरोबर राज्यातील भाजप नेत्यांशी संघटनात्मक बाबींवर चर्चा करणार आहेत. तसेच राज्यात होऊ घातलेल्या आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक तयारीचा आढावा घेणार असल्याचे समजते.
मंत्री अमित शहा हे उद्या, रविवारी रात्री साडेनऊ वाजता नागपूर येथे दाखल होतील. सोमवारी सकाळी जामठाच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट येथील स्वस्ति निवास पंथागार येथील भूमिपूजनाच्या कार्यक्रमाला ते उपस्थित राहणार आहेत. दुपारी १ वाजता चिंचोली येथील एनएफएसयूच्या स्थायी परिषदेच्या भूमिपूजन समारंभात ते सहभागी होईल. त्याच दिवशी दुपारी ३ वाजता ते नांदेडला पोहोचणार आहेत. दुपारी नांदेड येथील आनंदनगरातील माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेचे शहा यांच्या हस्ते अनावरण होईल. दुपारीच ते कुसुम ऑडिटोरियम येथे बैठक घेणार आहेत. संध्याकाळी नांदेडमध्ये अमित शहा यांची जाहीर सभा होणार आहे.
सोमवारी रात्री त्यांचे मुंबईत आगमन होईल. मंगळवारी सर कावसजी जहांगीर सभागृह येथे स्वातंत्र्यावीर विनायक दामोदर सावरकर यांच्या ६० व्या पुण्यतिथीनिमित्त अमित शहा यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.
मुंबईतील माधवबाग संकुलातील प्रसिद्ध श्री लक्ष्मी नारायण मंदिराचे १५० वर्ष पूर्ण झाल्याबद्दल २७ मे रोजी जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशासाठी हा एक ऐतिहासिक क्षण असल्याने या कार्यक्रमासाठी अमित शहा आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहणार आहेत. मंदिराच्या शतकोत्तर परंपरेचा गौरव करणारा विशेष सांस्कृतिक कार्यक्रम देखील यावेळी आयोजित करण्यात आला आहे.
दरम्यान, आपल्या दौऱ्यात अमित शहा हे राज्यातील आगामी महापालिका, जिल्हा परिषदा निवडणुका महायुतीच्या माध्यमातून कशा लढता येतील, याबाबत प्रदेश भाजपच्या नेत्यांशी चर्चा करणार असल्याचे सांगण्यात येते. तसेच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार हेही अमित शहा यांची भेट घेऊन राजकीय विषयांवर चर्चा करण्याची शक्यता आहे.