शिर्डी |प्रतिनिधी| Shirdi
भारत देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पाकिस्तानमध्ये 10 लाख हिंदूंची हत्या करण्यात आली होती. तेव्हा काँग्रेसचे लोक काही बोलले नव्हते. गेल्या 70 वर्षांपासून काँग्रेसचे काही लोक, भूमाफीया, वक्फ बोर्डाच्या लोकांनी लाखो एकर जमीन लुटली आहे. मात्र त्यांनी एकाही गरीब मुस्लिमाचा फायदा केलेला नाही. त्यामुळे आता वक्फ बोर्डाच्या जमिनी सुरक्षित ठेवण्याचा निर्णय सरकारनं घेतला असल्याचे प्रतिपादन केंद्रीय मंत्री जी. किशन रेड्डी यांनी शिर्डीत केले.
ना. जी.किशन रेड्डी यांनी शनिवारी सहकुटुंब साई दरबारी मध्यान्ह आरतीला हजेरी लावत साई समाधीचे दर्शन घेतले. यावेळी त्यांचा साईबाबा संस्थानच्या वतीने उपकार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खा. भाऊसाहेब वाकचौरे, जनसंपर्क अधिकारी तुषार शेळके, मंदिर पर्यवेक्षक राजेंद्र पवार आदी उपस्थित होते. साई दर्शनानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले आजही तेलंगाणा राज्यात बघितले तर मोठमोठे मुस्लिम नेते ओवीसींच्या पक्षाच्या लोकांनी आणि काँग्रेस नेत्यांनी हजारो एकर जमीनीवर कब्जा केला आहे.
एआयएमआयएम पार्टीच्या लोकांनी बेनामी मॅरेज हॉल तयार केले आहेत. त्यांना कोणतेही सरकार विचारत नाही. जातीय वाद वाढवण्याचं ते आजही काम करत आहेत. काँग्रेस पार्टी आज नाही तर, स्वातंत्र्य मिळण्याआधीपासूनच लोकांना विभक्त करण्याचं काम करत आली, असा आरोपही ना. रेड्डी यांनी केला.