Tuesday, May 21, 2024
Homeब्रेकिंग न्यूजकेंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ; यवतमाळमध्ये घडली घटना

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना भर सभेत भोवळ; यवतमाळमध्ये घडली घटना

यवतमाळ| राज्यासह देशभरात उन्हाचा कडाका बघायला मिळत आहे तर दुसरीकडे लोकसभा निवडणुकीमुळे राजकीय वातावरण तापत आहे. यवतमाळ वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील (Rajashree Patil) यांच्या प्रचारार्थ पुसद येथे सुरू असलेल्या सभेत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Union Minister Nitin Gadkari) भोवळ येऊन ते स्टेजवरच कोसळले. भरसभेत भाषणादरम्यान ही घटना घडली. नितीन गडकरी भाषण होते, त्याच वेळी अचानक त्यांना भोवळ आली. भोवळ आल्याने त्यांचा तोल जाऊन ते पडले असते, पण तितक्यात स्टेजवरील लोकांनी आणि त्यांच्या अंगरक्षकांनी नितीन गडकरी यांना सावरले.

महाराष्ट्रातील दुसऱ्या टप्प्यातील ८ मतदारसंघासाठी शुक्रवारी मतदान होणार आहे. त्यातच, मतदारसंघात बुधवारी प्रचाराचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे राज्यातील आघाडीच्या बहुतांश नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघाच्या महायुतीच्या उमेदवार राजश्री पाटील यांच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती. पुसद तालुक्यातल्या या सभेसाठी मोठी गर्दी जमली होती. त्यातच, विदर्भाच्या काही भागात उष्णतेची लाट असून पारा ४२ अंश सेल्सियस इतका होता. सभेत नितीन गडकरी भाषण करण्यासाठी आले. यावेळी, त्यांनी उपस्थितांना जवळपास १५ मिनिटे संबोधित केले. भाषण करत असताना अचानक त्याना भोवळ आली. गडकरी यांच्या अंगररक्षकांनी त्यांना वेळीच सावरले आणि ताताडीने प्रथमोपचार देण्यात आले.

- Advertisement -

दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी स्वत: एक्सवरुन पोस्ट करून आपण तंदुरूस्त असल्याची माहिती दिली. महाराष्ट्रातील पुसद येथील रॅली दरम्यान उष्णतेच्या कारणास्तव थोडेसे अस्वस्थ वाटले. पण आता मी पूर्णपणे तंदुरूस्त आहे आणि पुढील सभेत सहभागी होण्यासाठी वरूडला निघालो आहे. माझ्यावर तुम्ही दाखवलेले प्रेम आणि सदिच्छांसाठी सर्वांचे आभार, असे ट्विट गडकरींनी केले आहे.

याआधीही आली होती भोवळ
याआधीही २०१९ साली १ ऑगस्टला गडकरी यांना सार्वजनिक कार्यक्रमात भोवळ आली होती. सोलापूर विद्यापीठाच्या कार्यक्रमात समारोपावेळी राष्ट्रगीत सुरु असताना गडकरींना भोवळ आली होती. राष्ट्रगीत सुरू असताना नितीन गडकरी अचानक खाली बसले आणि पुन्हा उभे राहण्याचा प्रयत्न केला, त्यावेळी त्यांना भोवळ आली. तर, अहमदनगरमधल्या एका कार्यक्रमात गडकरींना भोवळ आली होती. पश्चिम बंगालमध्येही एका जाहीर कार्यक्रमादरम्यान गडकरींची तब्येत बिघडली होती. भाषण सुरू असताना अचानक त्यांना भोवळ आली. २०१९ साली शिर्डीमधील एका कार्यक्रमामध्ये स्टेजवरच असताना ते कोसळले होते.

- Advertisment -

ताज्या बातम्या