नाशिक | प्रतिनिधी Nashik
आडगाव हद्दीतील धात्रक फाटा परिसरामध्ये अल्पवयीन मुलावर अनैसर्गिक अत्याचार करणाऱ्या आरोपीला २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा न्यायालयाने ठोठावली आहे. तर, ५० हजारांचा दंडही केला असून या दंडापैकी २५ हजार पीडित मुलाला देण्याचेही आदेश जिल्हा व सत्र न्यायालयाने दिले आहेत.
रोहित संजय पवार (२०, रा. निशांत गार्डनच्या मागे, धात्रक फाटा, पंचवटी) असे शिक्षा ठोठावण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना २७ एप्रिल २०२३ रोजी सायंकाळी सहाते साडेआठ या दरम्यान घडली होती. आरोपी पवार याने पीडित आठ वर्षीय अल्पवयीन मुलाला स्वत:च्या दुचाकीवर बसवून त्याच्या घरी घेऊन गेला आणि त्याच्यावर बळजबरीने अनैसर्गिक लैगिंक अत्याचार केला. ही घटना कोणाला सांगितल्यास ‘तुला मारून टाकेल’, अशी धमकी दिली होती.
याप्रकरणी आडगाव पोलिसात पोक्सोसह अनैसर्गिक अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला. तपास तत्कालीन निरीक्षक इरफान शेख यांनी केला आणि दोषारोपपत्र सादर केले होते. जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश पी. व्ही. घुले यांच्यासमोर या खटल्याचे कामकाज चालले. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता लीना चव्हाण यांनी साक्षीदार तपासत कामकाज पाहिले.
न्यायाधिश घुले यांनी आरोपीला दोषी धरुन २० वर्षे सक्तमजुरीची शिक्षा आणि ५० हजारांचा दंड ठोठावला. पैरवी अधिकारी म्हणून महिला हवालदार प्रेरणा अंबादे, हवालदार सोमनाथ शिंदे, सुनील बाविस्कर, महिला अंमलदार मोनिका तेजाळे यांनी पाठपुरावा केला.