Saturday, July 27, 2024
Homeमुख्य बातम्याबेशिस्त पार्किंगचा वाहतुकीला अडथळा

बेशिस्त पार्किंगचा वाहतुकीला अडथळा

नाशिक । रवींद्र केडीया Nashik

सातपूर ( Satpur ) परिसराची मुख्य बाजारपेठ व छत्रपती शिवाजी महाराज मंडई (Chhatrapati Shivaji Maharaj Mandai)परिसरात विशिष्ट वाहन चालकांच्या बेशिस्त पार्किंगमुळे ( Parking ) व अस्ताव्यस्त वाढलेल्या अतिक्रमणामुळे वाहतुकीचे तीनतेरा वाजल्याचे चित्र असून वाहतूक विभाग याकडे सपशेल दुर्लक्ष करीत असल्याचे दिसून येत आहे.

- Advertisement -

सातपूर विभाग हा आयटीआय सिंग्नलपासून सुरू होतो. तिथूनच अतिक्रमणाला प्रारंभ होत आहे. या परिसरात मोठ्या हॉटेल्स व विविध बँकांच्या माध्यमातून नागरिकांच्या वाहनांची गर्दी रस्त्यावरच होत असते. त्यांची वाहने मुख्यत: त्र्यंबकरोडवरच लावली जातात.

सातपूर पोलीस ठाणे चौफुली, महानगरपालिका विभागीय कार्यालयालगतची चौफुली तसेच व्हिक्टर गॅस्केट कंपनीच्या चौफुलीवर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी होत असते.याठिकाणी उद्योग क्षेत्राकडे वळणारी अवजड वाहने आणि त्र्यंंबकरोड वरील वाहने यांच्यामुळे या ठिकाणी नेहमीच कामगार कष्टकर्‍यांना अडथळ्याची शर्यत पार करावी लागत असते. त्यामुळे छोट्या वाहनधारकांना नेहमीच वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. परिसरातील सातपूर कॉलनी, अशोकनगर, अंबड लिंकरोड, पपया नर्सरी चौफुली या भागात अतिक्रमण वाढलेले असल्याने ग्राहक त्यापुढे वाहन पार्किंग करतात.

परिणामी सदर परिसरात नेहमीच वाहतूक कोंडी असते. काही विक्रेत्यांनी तर आपल्या दुकानासमोरील महापालिकेची जागा चक्क हातगाडी वाल्यांना भाड्याने दिली असल्याचे काही नागरिकांनी सांगितले. सातपूर गावाजवळ त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या बसेससाठी बसस्थानक आहे. मात्र कॅन्टीन जास्त असल्यामुळे तेथे प्रवाशांपेक्षा खवय्येच मोठ्या प्रमाणात रस्त्यावर उभे राहतात. त्यापुढे हातगाड्यांचे अतिक्रमण आहे. त्यानंंतर त्र्यंंबकेश्वरच्या दिशेने जाणार्‍या टॅक्सीचा स्टॅण्ड असल्याने रस्ता काबीज होतो. या सोबतच भाजी बाजारात जाणार्‍या नागरिकांच्या वाहनांची पार्किंग असल्यामुळे बसेस थेट रस्त्यावर उभ्या राहत असतात.त्यामुळे या चौकात वाहतुकीची कोंडी ही नित्याचीच बाब ठरलेली आहे.

छत्रपती शिवाजी मंडईकडून नाशिककडे अथवा कॉलनीकडे वळणार्‍या वाहनांचा त्र्यंबकेश्वरकडे जाणार्‍या वाहनांमुळे नेहमीच अडथळा ठरत आहेत. त्यात त्र्यंबकेश्वर रस्त्यावर सातत्याने वाढणारे अतिक्रमण ही डोकेदुखीच ठरली आहे. या अतिक्रमणावर मनपाचे अतिक्रमण पथक कोणतीच कारवाई करीत नाही. केल्यास केवळ कारवाईचा फार्स केला जातो. वाहतूक विभाग व महापालिकेच्या अतिक्रमण विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष दिले, तर सातपूर परिसरातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल.

सातपूर कॉलनीतील मार्केट परिसरातील रस्ते अरूंद आहेत. त्यामुळे बस अथवा तत्सम कोठे वाहन आल्यास वाहतूक कोंडी नित्याचीच ठरलली आहे. अशोकनगर चौफुली, अशोकनगर शेवटच्या स्टॉपजवळ भाजी बाजारामुळे वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झालेली आहे. महापालिकेतर्फे अतिक्रमण मोहीम राबविणे म्हणजे केवळ मलमपट्टी असते. आजार मुळापासून काढण्यासाठी प्रयत्न केले जात नसल्याचे दिसून येते. याकरिता महापालिका व वाहतूक विभाग यांनी संयुक्तिकरित्या व सलग मोहीम राबविल्यास या अतिक्रमणांना आळा बसणे शक्य आहे.

सातपूर परिसरात वाहतूक शाखेचे कर्मचारी कधीच दिसत नाहीत. बेशिस्त वाहन चालकांवर कारवाईचे कुठल्याही प्रकारचे नियोजन नाही. सकाळी आणि सायंकाळी रहदारीचा मोठा अडथळा निर्माण होत आहे.सातपूर विभागासाठी वाहतूक पोलीसांची नेमणूकच केलेली नाही. प्रत्यक्षात वाहतूक पोलीस फक्त पपया चौफुलीवर ठाण मांडून बसलेले असतात. त्यांची ड्यूटी कोठे आहे तेच माहीत नसते.

विजय अहिरे ,सामाजिक कार्यकर्ते

सातपूर कॉलनीतील श्रीराम चौकात मोठ्या प्रमाणात फ्रुट मार्केट उभे राहिले आहे. रस्त्याच्या कडेला हातगाड्या लावून फळ विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत. या परिसरात मिसळचे गाडे, नाश्त्याचे गाडे या भोवती होणार्‍या खवय्यांच्या गर्दीमुळे मुख्य रस्त्यावर वाहनांची गर्दी मोठ्या प्रमाणात राहते. त्यामुळे मुख्य रस्त्यावरुन जाणार्‍या वाहनांची व सातपूर कॉलनीकडे वळणार्‍या वाहनांना नेहमीच मोठी कसरत करावी लागते. प्रशासनाने हे रस्ते मोकळे करावेत.

रामहरी संभेराव , सामाजिक कार्यकर्ते

- Advertisment -

ताज्या बातम्या