अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात सोमवार (दि.5) मे रोजी झालेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा, जामखेड आणि राहुरी तालुक्यातील 22 गावांतील 231 शेतकर्यांच्या 120.3 हेक्टर वरील पिकांना फटका बसला आहे. यापूर्वीही मागील महिन्यांत झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकर्यांचे कोटी रुपयांचे नुकसान झाले होते. त्यात आता नव्याने भर पडली आहे.
सोमवारी दुपारी व सायंकाळी जिल्ह्याच्या विविध भागात झालेल्या अवकाळी पावसामुळे टोमॅटो, भाजीपाला, चारा पिके, आंबा, कांदा, केळी, डाळिंब, पपई, शेवगा, दोडका, चिकू या बागाचे नुकसान झाले आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात कसेबसे पाणी देऊन जगवलेल्या फळबागा व चारा पिके यांचे नुकसान झाले आहे. यात पारनेर तालुक्यातील चार गावांतील 145 शेतकर्यांचे, पाथर्डी तालुक्यातील एका गावातील 18 शेतकर्यांचे, श्रीगोंदा तालुक्यातील चार गावांतील 18 शेतकर्यांची, जामखेड तालुक्यातील दहा गावांतील 43 शेतकर्यांचे, राहुरी तालुक्यातील 3 गावांतील सात शेतकर्यांचे 231 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. याबाबतचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार करून जिल्हा प्रशासनाला सादर केलेला आहे.
यापूर्वी मागील महिन्यांत 5 तालुक्यांतील 39 गावांतील 2 हजार 22 शेतकर्यांना अवकळीचा फटका बसला होता. यात शेतकर्यांची 892.35 हेक्टर वरील विविध पिकांचे नुकसान झाले होते. मागील महिन्यांत तीन वेगवेगळ्या दिवशी अवकाळी पाऊस झाला होता. यात आंबा, टोमॅटो, वटाणा, मका, कांदा, केळी बाग, झेंडूची फुले, काढणीस आलेला गहू, डाळिंब, द्राक्ष बागा, भाजीपाला पिके, उन्हाळी बाजरी, चारा पिके आणि पेरूच्या बागांना फटका बसला होता.