दिल्ली । Delhi
बिहार आणि उत्तर प्रदेश या दोन राज्यांमध्ये अवकाळी पावसाने थैमान घातलं असून या हवामान बदलामुळे भीषण नुकसान झालं आहे. एकीकडे प्रचंड उष्णतेने त्रस्त जनता तर दुसरीकडे अचानक आलेल्या अवकाळी पावसामुळे अनेकांचे आयुष्य उध्वस्त झाले आहे.
उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये वादळी वाऱ्यांसह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीज कोसळण्याच्या घटना नोंदवण्यात आल्या आहेत. या दोन्ही राज्यांमध्ये एकूण ४७ जणांचा मृत्यू वीज कोसळल्यामुळे आणि वादळामुळे झाल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
बिहारमध्ये अवकाळी पाऊस, वादळ आणि गारपिटीमुळे २५ नागरिकांचा जीव गेला आहे. या दुर्घटना विविध जिल्ह्यांमध्ये घडल्या असून, अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वीज कोसळल्याने शेतात काम करत असलेल्या शेतकऱ्यांना आणि उघड्यावर असलेल्या नागरिकांना आपला जीव गमवावा लागला.
उत्तर प्रदेशातील १५ जिल्ह्यांमध्ये जोरदार गारपीट झाल्याचे वृत्त आहे. यामुळे शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे. नुकतेच रब्बी हंगामातील पीक तयार झाले असताना त्यावर गारपिटीने मोठा घाला घातला. गहू, हरभरा, मका यासारख्या पिकांना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
दोन्ही राज्यांमध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले आहे. उभ्या पिकांवर वीज कोसळणे, जोरदार पावसामुळे जमिनीची धूप, गारपिट आणि वादळी वाऱ्यांमुळे झाडांची पडझड यामुळे शेतीचे आर्थिक गणित कोलमडले आहे. अनेक भागांत झोपड्या आणि घरांचीही पडझड झाली आहे.
राज्य प्रशासनाने तात्काळ मदत आणि बचाव कार्य सुरू केल्याचे सांगितले आहे. मृतांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदतीची घोषणा करण्यात आली आहे. हवामान खात्याने पुढील काही दिवसही अस्थिर हवामानाची शक्यता वर्तवली आहे, त्यामुळे नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.