कंधाणे । वार्ताहर Kandhane
बागलाण तालुक्यातील ( Baglan Taluka )कंधाणे परिसरात काल मध्यरात्रीनंतर अवकाळी पावसाने विजेच्या गडगडाटासह सुमारे तास सततधार हजेरी लावली. त्यामुळे कांदा पिकासह गहू, हरभरा पिके संकटात सापडली आहेत. गहू-हरभरा सोंगणीचे काम सुरू असतानाच अचानक आलेल्या अवकाळी पावसाने शेतकर्यांची तारांबळ उडाली. रात्रीच्या सुमारास झालेल्या पावसामुळे कापणी केलेले गहू, हरभरा पीक पावसात भिजल्याने होणार्या आर्थिक नुकसानीने शेतकरी हवालदिल झाले आहेत. पावसाबरोबर जोराचा वारा असल्याने उशीरा पेरणी झालेले व सध्या ओंबीवर आलेले गहू पीक भुईसपाट केले आहे.
यंदा रब्बी हंगामाला सुरूवातीपासूनच या भागात निसर्गाची अवकृपा राहिली आहे. ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर महिन्यात अवकाळीने कंधाणे परिसरात टप्याटप्याने हजेरी लावत शेतमालाची हानी केली होती. रब्बी हंगामातील पिकांची लागवड करताना शेतकर्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागले होते. आधीच उशीराने सुरू झालेला रब्बी हंगामातील कांदा लागवड त्यात मजूर टंचाईच्या समस्या या दुहेरी संकटांचा सामना करीत बळीराजांकडून उशीराने कांदा लागवड केली.
जानेवारी महिन्यात सुरू झालेली ही लागवड फेब्रुवारीच्या मध्यान्हापर्यंत सुरू होती. काल झालेल्या अवकाळी पावसामुळे या भागातील कांदा पिक संकटात सापडले असून या पावसामुळे कांदा पीकावर मोहा, भुरी व करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्याप्रमाणात वाढणार असल्याने येणार्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट निर्माण होणार असल्याची चिंता कृषीतज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.
सध्या परिसरात उन्हाचा प्रकोप वाढला असून त्यातच अवकाळीचा तडाख्यामुळे कांदा पिकावर महागडया कीटकनाशकांची फवारणी करावी लागणार आहे. रासायनिक खते व कीटकनाशके व बुरशीजन्य औषधांच्या किमतीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे.
व्हॉट्सअॅप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा…
अवकाळी पावसाचीे हजेरी
ननाशी । दिंडोरी तालुक्याचा पश्चिम भाग असलेल्या ननाशी आणि परिसरात शनिवारी पहाटे अवकाळी पावसाने दमदार हजेरी लावली आहे. परिसरात शनिवारी दिवसभर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर सायंकाळी पाच ते सहा वाजेदरम्यान हलक्या स्वरूपाचा रिमझिम पाऊस झाला. मात्र पहाटे चार ते पाच वाजेच्या दरम्यान मेगगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह तासभर जोरदार हजेरी लावली आहे. अवकाळी पावसाने परिसरात हवेत काहीसा गारवा निर्माण झाल्याने नागरिकांना उकाड्यापासून काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे.