Friday, April 4, 2025
Homeनगर2 हजार शेतकर्‍यांना अवकाळीचा दणका

2 हजार शेतकर्‍यांना अवकाळीचा दणका

सर्वाधिक नुकसान संगमनेरमध्ये || कृषी विभागाचा प्राथमिक अहवाल

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

गेल्या दोन दिवसापासून नगर जिल्ह्याच्या विविध भागात अवकाळी पावसासह गारपिटीचा तडाखा बसत आहे. यामुळे ऐन उन्हाळ्यात अनेक ठिकाणी दमदार पाऊस बसत असून अनेक ठिकाणी शेतातील उभ्या पिकात पाण्याचे तळे साचले आहे. तर अनेक ठिकाणी भर उन्हाळ्यात रस्त्यावरून खळखळून पाणी वाहतांना दिसत आहे. जिल्ह्यात कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार 2 एप्रिलला 5 तालुक्यांतील 39 गावांतील 2 हजार 22 शेतकर्‍यांना अवकळीचा फटका बसला असून या शेतकर्‍यांची 892.35 हेक्टरवरील विविध पिकांचे नुकसान झाले आहे.

- Advertisement -

दरम्यान गुरुवारी (दि.3) रोजी दुपारी चार पासूनच नगर शहरासह दक्षिण जिल्ह्यातील काही तालुक्यांत पुन्हा वादळी वार्‍यासह जोरदार पाऊस बरसला असून यामुळे शेतकर्‍यांच्या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समोर आले आहे. कृषी विभागाच्यावतीने वादळी वार्‍यासह झालेल्या गारपिटीच्या नुकसानीचे पंचनामे सुरू करण्यात आले आहेत. कृषी व महसूल विभागाच्या प्राथमिक माहितीनुसार जिल्ह्यात संगमनेर, पारनेर, कर्जत, नगर आणि अकोले तालुक्यातील 39 गावांतील 2 हजार 22 शेतकर्‍यांना या अवकाळीचा फटका बसला आहे. यात 138.90 हेक्टरवरील 327 शेतकर्‍यांचे 33 टक्क्यांच्या आत तर 1 हजार 695 शेतकर्‍यांचे 753.45 हेक्टरवरील पिकांचे 33 टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे.

गुरूवारी दुपारी ते रात्री उशीरापर्यंत पावसाळ्याप्रमाणे अनेक ठिकाणी ढगांचा गडगडात आणि विजेचा लखलखाट सुरू होता. अनेक ठिकाणी जोरदार वार्‍यासह पावसाच्या सरी कोसळ्या. नगर शहर आणि एमआयडीसी भागात पावसाच्या सरी कोसळ्या. या अवकाळी पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला होता.

दोन गायी मृत्यूमुखी
महसूल विभागाच्या माहितीनूसार नगर जिल्ह्यात संगमनेर तालुक्यात दोन गायी दगावल्या असून एका घराची पडझड झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाकडे उपलब्ध झाली आहे. मात्र, पारनेर, कर्जत, नगर आणि अकोले तालुक्यात अवकाळी आणि गारपिठीमुळे घरांसह पशूधनाचे नुकसान झाले असून संबंधीतांचे तातडीने पंचनामे करण्याची मागणी होत आहे.

पारनेर तालुक्यात कांदा पिकाचे नुकसान
पारनेर तालुक्यात बुधवारी आणि गुरूवारी सलग दोन दिवस झालेल्या पावसामुळे कांदा पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यात मोठ्या प्रमाणात उन्हाळी कांदा पिकाची काढणी सुरू होती. शेतात उघड्यावर असणार्‍या कांदा पिकाला अवकाळीसह गारपिठीचा फटका बसला आहे.

तालुकानिहाय झालेला पाऊस
नगर-1.3, पारनेर-7, श्रीगोंदे- 1.1, कर्जत 11.7, जामखेड 1.2, शेवगाव-0.1, राहुरी-0.1, संगमनेर 1.4, अकोले 4 तर पाथर्डी, कोपरगाव, श्रीरामपूर, राहाता, नेवासे या तालुक्यात अवकाळी पाऊस झाला नाही.

प्रमुख मंडलात झालेला पाऊस
रूईछत्तीशी 5.3 चिचोंडी पाटील 6.8, टाकळी ढोकेश्वर 28.3, कान्हूर पठार 28.3, मिरजगाव 44.5, माही 18.3, कर्जत 12.5, वालवड 12.5, कोरेगाव 12.8. अरणगाव 8.5, धांदरफळ 7, संगमनेर 3.3, घुलेवाडी 3.5, वीरगाव 10.8, अकोले 7, ब्राह्मणवाडा 5.3, रूंभोडी 7 असा आहे.

या पिकांना बसला फटका
जिल्ह्यात दोन दिवसांपासून बरसणार्‍या अवकाळी पावसामुळे आंबा, टोमॅटो, वाटाणा, मका, कांदा, केळी बाग, झेंडूची फुले, काढणीस आलेला गहू, डाळिंब, द्राक्ष बागा, भाजीपाला पिके, उन्हाळी बाजरी, चारा पिके आणि पेरूच्या बागांना फटका बसला आहे.

वांबोरीतही जोरदार हजेरी
जिल्ह्यात कालही कमी अधिक प्रमाणात पाऊस कोसळत होता. राहुरी तालुक्यातील वांबोरीत 7 ते 8 वाजेच्या दरम्यान वादळी पाऊस झाला. त्यामुळे गहू, कांदा व अन्य पिकांचे नुकसान झाले.

याठिकाणी झाले नुकसान
नगर तालुका 1 गाव, दोन शेतकरी आणि 0. 90 हेक्टर, पारनेर 1 गाव 259 शेतकरी आणि 128.10 हेक्टर, कर्जत 20 गावे 53 शेतकरी आणि 13.83 हेक्टर, संगमनेर 13 गावे, 1 हजार 488 शेतकरी 677.52 हेक्टर, अकोले 4 गावे, 220 शेतकरी आणि 72 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

अकोलेत दुसर्‍या दिवशीही अवकाळी
अकोले प्रतिनिधीने कळविले की, बुधवारी अकोले तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पावसाने हजेरी लावली. काल गुरूवारी रात्री 8 ते 9 वाजेदरम्यान अकोले शहरात मुसळधार पाऊस झाला. कोतूळ भागातही रात्री पाऊस सुरू झाला होता. या विजांच्या कडकडाटामुळे वीजपुरवठा खंडित होत होता.

पाथर्डीत पावसामुळे नुकसान

पाथर्डी |तालुका प्रतिनिधी| Pathardi

पाथर्डी तालुक्यात अवकाळी पाऊस आणि वार्‍याचा तडाख्याने पिकांचे स्वरूपाचे नुकसान झाल्याच्या घटना घडल्या आहेत. 1 एप्रिल मंगळवारी राज्यातील अनेक भागांमध्ये अचानक अवकाळी पावसाने हजेरी लावली. त्यात पाथर्डी तालुक्यातही अवकाळी पावस व वार्‍याचा तडाखा बसल्याने शेतीचे अनेक ठिकाणी नुकसान झाले आहे. काही ठिकाणी विजेच्या गडगडाटासह पाऊस पडला, तर काही ठिकाणी वार्‍यामुळे शेती पिकांचे नुकसान होऊन जनजीवन विस्कळीत झाले. विशेषतः तालुक्यातील पूर्व भागात टाकळी मानूर,पिंपळगाव टप्पा,चिंचपूर इजदे, कुत्तरवाडी, करोडी, मोहटे या भागात अवकाळी पावसासोबतच वार्‍याने शेतकर्‍यांची उन्हाळी बाजरी, काढणीला आलेला कांदा, आंबा व फळबागांचे नुकसान झाले आहे. उभ्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत. मंगळवारी वारा पाऊस या दरम्यान अनेक ठिकाणी विजेच्या तारा तुटल्याने वीजपुरवठा खंडित झाला. काही भागात रात्रभर वीज गायब होती. तर काही ठिकाणी कमी दाबाची वीज पुरवठा झाल्याने विजेचे उपकरणे कार्य करत नव्हते. विजेचा लपंडाव बुधवारी सकाळीपर्यंत सुरू होता. उन्हाळ्याच्या उष्णतेत रात्री वीज पुरवठा खंडित झाल्याने नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागला. वाढत्या तापमानामुळे आधीच उकाड्याने हैराण असलेल्या लोकांना वीज नसल्याने झोपेचा खोळंबा झाला. बुधवारी सकाळ वातावरण ढगाळ स्वरूपाचे होते तर दुपारी पण पडून नंतर ढगाळ वातावरण तयार झाले होते.हवामान बदलाचा शेती, आरोग्य आणि दैनंदिन जीवनावर त्याचा परिणाम नागरिकांना जाणवत आहे.

YouTube video player
- Advertisment -spot_img

ताज्या बातम्या

BJP : भाजपच्या तिन्ही जिल्हाध्यक्ष निवडी 25 एप्रिलपर्यंत होणार

0
अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar भाजपच्या संघटन पर्व सदस्य नोंदणी अभियानांतर्गत नगर जिल्ह्यातील उत्तर नगर, दक्षिण नगर व नगर शहर महानगर जिल्हाध्यक्ष अशा तीनही प्रमुख पदाधिकार्‍यांच्या निवडी...