Saturday, May 25, 2024
Homeनगर३६ हजार शेतकऱ्यांना 'अवकाळी'चा दणका

३६ हजार शेतकऱ्यांना ‘अवकाळी’चा दणका

अहमदनगर (प्रतिनिधी)

सलग चार दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाची हजेरी सुरू आहे. या पावसाने जिल्ह्यात २५८ गावांतील केळी, कांदा, पेरू, मका, द्राक्षे, ज्वारी, टोमॅटो, डाळिंब पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले आहे. त्यात ३३ टक्के पेक्षा कमी २१ हजार ५८१ हेक्टर क्षेत्राच्या पिकांचे तर ३३ टक्क्यांपेक्षा जादा २२ हजार ८०६ हेक्टर क्षेत्राचे नुकसान झाले आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील ३६ हजार ३४३ शेतक-यांना फटका बसला असल्याची माहिती जिल्हा प्रशासन आणि महसूलच्यावतीने देण्यात आली.

- Advertisement -

जिल्ह्यात २६ नोव्हेंबरपासून अवकाळी पाऊस बरसत आहे. गुरूवारी रात्री आणि शुक्रवारी देखील अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे जिल्ह्यातील नुकसानग्रस्त गावांचा आकडा आणि नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचा आकडा दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. तीन दिवसांपूर्वी जिल्ह्यातील २०७ गावांत अवकाळीमुळे नुकसान झाले होते. त्यात ५१ गावांची भर पडली आहे. तसेच नुकसान झालेल्या क्षेत्राचा आकडा देखील वाढताना दिसत आहे. अवकाळी झालेल्या तालुक्यात महसूल आणि कृषी विभागाच्यावतीने पंचनामे सुरू असून त्याचा वेग वाढवण्याची मागणी होत आहे. अवकाळीच्या तडाख्यामुळे शेतकरी हवालदिल होताना दिसत आहे.

जिल्ह्यात अवकाळीच्या तडाख्यातून श्रीरामपूर, राहुरी, शेवगाव आणि कोपरगाव तालुका वाचले असल्याचे कृषी विभागाच्या नुकसानीच्या आकडेवारीवरून दिसत आहे. जिल्ह्यात नगर तालुक्यात ९, पारनेर ४९, पाथर्डी १, श्रीगोंदा ४२, जामखेड ४०, श्रीरामपूर २७, नेवासा ४, संगमनेर १३, अकोले ६०, राहाता ७ या गावात अकाळीचा फटका बसला आहे. कोपरगाव तालुक्यातील ६ गावात अवकाळीमुळे नुकसान झाले असले तरी ते ३३ टक्क्यांच्या आत आहे. कर्जत तालुक्यातील माहिती मिळणे बाकी असल्याचे कृषी विभागाकडून सांगण्यात आले.

असे आहे नुकसान

२५८ गावे, २७ हजार १०४ शेतकऱ्यांचे २१ हजार ५८१ हेक्टरवर ३३ टक्क्यांच्या आत तर ३६ हजार ३४३ शेतकऱ्यांचे २२ हजार ८०६ हेक्टरवर ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झालेले आहे. यात केळी, कांदा, पेरू, मका, द्राक्ष, ज्वारी, टोमॅटो, डाळिंब, बोर, पपई, सिताफळ, कांदा, कापूस, लिंबू, भाजीपाला, सोयाबीन, मका, तूर, बाजरी, भात या पिकांचा समावेश असल्याची माहिती कृषी विभागाच्या नुकसानीच्या माहितीत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या