अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar
जिल्ह्यात 9 ते 12 मे या कालावधीत अवकाळीसह वादळाच्या तडाख्यामुळे पाथर्डी, अकोले आणि नगर तालुक्यातील 35 गावांत शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यासह गेल्या दीड महिन्यात वीज व झाड पडून दोन जणांचे बळी गेले असून तीन जनावरांसह आठ घरांची पडझड झाली असल्याची माहिती प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
यंदा जिल्ह्यात वादळाच्या तडाख्यासह टप्प्याटप्प्याने अवकळी, गारपीट व वादळाचा कहर सुरू आहे. एप्रिल महिन्यात तीन वेगवेगळ्या दिवशी अवकाळीचा फटका शेतकर्यांना बसला होता. त्यानंतर आता मे महिन्यात देखील अवकाळीचा कहर सुरू असून शेती नुकसानीचा आकडा वाढताना दिसत आहे. जिल्ह्यात 9 ते 12 मे या कालावधीत पाथर्डी, अकोले आणि नगर तालुक्यात 35 गावांतील 250 शेतकर्यांची 115.55 पिकांचे नुकसान झालेले आहे. यात 183 शेतकर्याचे 70 हेक्टरवर 33 टक्क्यांपेक्षा कमी तर 67 शेतकर्यांचे 45.55 हेक्टर वर नुकसान झाल्याचा प्राथमिक अहवाल कृषी विभागाने तयार केला आहे.
जिल्ह्यात पुढील काही दिवसांत अवकाळीसह मान्सूनपूर्व पावसाचा मुक्काम राहणार असून, यामुळे शेतकर्यांनी पिकांसह पशुधन याची काळजी घ्यावी असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे. जिल्ह्यात 9 ते 12 मे यादरम्यान वादळ सर्वाधिक तडाखा पाथर्डी तालुक्यातील 24 गावांना बसला असून या ठिकाणच्या 106 शेतकर्यांचे 73.60 हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. यासह अकोले तालुक्यातील सहा गावात 73 शेतकर्यांची 18.35 हेक्टर वरील पिकांची नुकसान झालेले असून नगर तालुक्यातील पाच शेतकर्यांची पाच हेक्टर वरील पिकांचे नुकसान झालेले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत पाच हजारांहून अधिक हेक्टर वरील पिकांना वादळाचा तडाखा बसलेला असून नुकसान झालेल्या पिकाची पंचनामे करून जिल्हा प्रशासनाला अहवाल सादर करण्यात आल्याचे कृषी विभागाकडून कळविण्यात आले आहे.
या पिकांचे झाले नुकसान
जिल्ह्यात गेल्या काही दिवसात आंबा, डाळिंब, मोसंबी, चिकू, मका, कांदा, उन्हाळी बाजरी, मिरची, केळी या पिकांसह फळ बागांचे नुकसान झालेले आहे.
असे आहे घरांचे नुकसान
जिल्ह्यात नेवासा तालुक्यात 3, कोपरगाव 2, अकोले 1 आणि शेवगाव तालुक्यातील 2 अशा आठ घरांची पडझड झालेली असून पाथर्डीत दोन म्हशीसह एक गाय दगावली आहे. तर अकोले तालुक्यात झाडपडून एकाचा तर नेवासा तालुक्यात वीज पडून एक अशा दोघांचा मृत्यू झालेला आहे.