Sunday, September 15, 2024
Homeनंदुरबारनंदुरबार जिल्हयात अवकाळी पावसाचा कहर

नंदुरबार जिल्हयात अवकाळी पावसाचा कहर

नंदुरबार । nandurbar। प्रतिनिधी

- Advertisement -

नंदुरबार जिल्हयात (Nandurbar district) आज सायंकाळी वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पावसाने (Unseasonal rain) हजेरी लावली. त्यामुळे शेतातील उभी पिके गहू, हरभरा, बाजरी, ऊस, केळी, पपई, कांदा व इतर भाजीपालावर्गीय पिकांचे मोठया (Damage to crops)प्रमाणावर नुकसान झाले.

नंदुरबार जिल्हयात आज सायंकाळी 4 च्या सुमारास ढगांच्या गडगडाट आणि वीजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. त्यामुळे शेतातील गहू, हरभरा, बाजरी, ऊस, केळी, पपई, कांदा व इतर भाजीपालावर्गीय पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले झाले आहे.

नवापूर

तालुक्यातील नवापूर, विसरवाडी, खांडबारा परिसरात आज सायंकाळी वादळी वारा आणि वीजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. ऐन होळीच्या दिवशी पाऊस झाल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.

आज दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास शहरास तालुक्यात प्रचंड वादळी वारा आणि विजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे नागरिकांची तारांबळ उडाली. रस्त्यावर व्यवसाय करणार्‍यांनी आपल्या साहित्याचे नुकसान होवू नये यासाठी धडपड केली.

आदिवासी बांधव होळी निमित्ताने बाजारात खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात येत असतात. त्याचधर्तीवर येथील लहान मोठे व्यापारी आपली दुकाने थाटून बसलेले असतात. आज झालेल्या अवकाळी वारा आणि पावसाने प्रचंड नुकसान केले असून बाजारपेठेत लावलेल्या दुकानदारांची साहित्य उचलायची एकच धावपळ उडाली होती. अनेक व्यापार्‍यांनी उन्हाच्या तडाख्यापासून वाचण्यासाठी लावलेले शेड अक्षरशः हवेत उडून गेले.

वर्षभर येथील व्यापारी होळीची वाट बघत असतात. होळी बाजाराच्या निमित्ताने मोठ्या खरेदी होत असते. त्या आशेवर अनेक व्यापारी आपल्या संपूर्ण परिवारासह व्यवसाय करतांना दिसतात. आजच्या अवकाळी पावसाने आर्थिक नुकसान झाले असून तालुक्यातील शेतकर्‍याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची भीती व्यक्त केली जात आहे.

तळोदा

शहरासह ग्रामीण भागात वादळासह अवकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे होळीची लाकडे व गोवर्‍या ओल्या झाल्या. गहु पक्व झाला असून पावसामूळे आडवे पडली. शेतकर्‍यांसाठी हा पाऊस नुकसानदायक ठरला आहे.

गेल्या दोन दिवसांपासून शहरासह तालुक्यात ढगाळ वातावरण आहे. कधी हलके थेंब येत होते. आज दि.6 रोजी साडेचार वाजेच्या सुमारास अवकाळी पावसाने वादळी वार्‍यासह जोरदार हजेरी लावली. यामुळे होळी पेटवण्यासाठी बाल गोपाळांनी लाकडे व गोवर्‍या गोळा केल्या होत्या. त्या ओल्या झाल्याने होळीच्या रंगात भंग झाला. सध्या गहू कापणीचा हंगाम सुरू आहे. काहींचे गहू पक्व झाले आहेत,तर काहिंचे चार आठ पंधरा दिवसांत कापणीला येतील. मात्र वादळी वार्‍यासह पावसाने गहू लोळवले असून जमिनदोस्त केल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. वादळामुळे केळीचे पीकाचेही नुकसान झाले आहे. कांदा ही कापणीला असून शेतातच आहे. या अवकाळी पावसाने गहू, हरभरा, केळी कांदा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. शेतकरी या पावसामुळे कर्जाच्या खाईत लोटले जाण्याची भिती व्यक्त करण्यात येत आहे.

चिनोदा

चिनोदासह परिसरात आज दि.6 मार्च रोजी सायंकाळी 4 ते 5 वाजेच्या सुमारास वीजेच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. तसेच ढगाळ वातावरणामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. अवकाळी पावसाचा गहू, हरभरा, टरबूज, केळी, डांगर आदींसह विविध पिकांवर प्रादूर्भाव होण्याची शक्यता शेतकर्‍यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

चिनोदासह परिसरात अवकाळी पाऊस तसेच ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खरीप हंगामातील कापसासह इतर पिकांचे नुकसान झाले होते. मात्र त्यातही शेतकरी रब्बी हंगामासाठी गहू, हरभरा, मिरची, ऊस, केळी, टरबूज या पिकांना शेतकर्‍यांकडून प्राधान्य देण्यात आले होते. पिकेही डोलू लागली होती तर गहू, हरभरा हे पिके काढणीला आले होते. मात्र अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा परिणाम रब्बी हंगामातील उत्पन्नावर होण्याच्या धास्तीने शेतकरी हवालदिल झाला आहे.

अवकाळी पाऊस व ढगाळ वातावरणाचा फटका गहू, हरभरा यासह इतर पिकांना बसण्याची शक्यता आहे. या अवकाळी पावसामुळे गहू बारीक पडण्याची शक्यता असून इतर पिकांवर विविध रोगांचा, किडींचा प्रादुर्भाव होण्याची भिती आहे, असे शेतकरी अरूण चव्हाण यांनी सांगितले.

बोरद

तळोदा तालुक्यातील बोरद येथे वार्‍यासह पावसाला सुरूवात झाल्याने भोंगर्‍या बाजारातील दुकानदारांची एकच तारांबळ उडाली.

बोरद येथे भोंगर्‍या बाजार भरला होता. दर वर्षापेक्षा या वर्षी मोठया प्रमाणावर भोंगर्‍या बाजार भरला. बाजारपेठेत मोठी गर्दी होती. अचानक 3.30 वाजेच्या सुमारास तुफान वारा सुटला. त्याचबरोबर पावसालाही सुरूवात झाली. त्यामुळे त्यांना तीन तास अगोदरच दुकान बंद करावी लागली. लांब लांब गावातून आल्याने त्यांचा व्यवसासायावर परिणाम झाला. अचानक पावसाला सुरूवात झाल्याने नुकसानाला सामोरे जावे लागले. वीजांचा कडकडाट व सोसायटयाच्या वार्‍यासह पावसाला सुरूवात झाली. शेतकर्‍यांनी हरभरे कापून ठेवली असल्याने त्यांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.

बामखेडा

रब्बी हंगामातील पिके काढण्यावर आली असताच निसर्गाने पुन्हा एकदा शेतकर्‍यांच्या तोंडाच्या घास हिरावून नेला आहे. सोमवारी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास झालेल्या अवकाळी पाऊस व वादळी वार्‍यामुळे गहू, हरभरा, मका, केळी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे उत्पादनात घट होणार आहे. दरम्यान महसूल व कृषी विभागाने पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना भरपाई द्यावी अशी मागणी होत आहे.

सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वीजांच्या कडकडासह वादळी वारा सुरू झाला. शहादा तालुक्यातील बामखेडा,वडाळी, कुकावल, कोठली, तोरखेडा, कोंढावळ, खैरवे, भडगाव, फेस परिसरात पावसाच्या एक तासाच्या हजेरीतच संपूर्ण पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. बामखेडा सह परिसरात सकाळपासूनच ढगाळ वातावरण होते. 4 वाजेपासून पावसाचे वातावरण तयार होऊन वीजांच्या कडकडासह ढगांच्या गडगडाट होऊन पावसाचे आगमन झाले. पावसाला जोरदार सुरुवात झाली. त्यामुळे काढणीवर आलेल्या गहू, हरभरा, मका, केळी तसेच इतर पिकांचे नुकसान झाले आहे. अवकाळी पावसामुळे येथील शेतकरी पुन्हा आर्थिक संकटात सापडला आहे.

वैजाली

वैजालीसह परिसरात आज सायंकाळी साडेचार वाजेपासून जोरदार वादळी वार्‍यासह पावसाला सुरुवात झाल्याने या भागातील शेतातील उभी पीके गहू, हरभरा, बाजरी, ऊस, केळी, पपई, कांदा व इतर भाजीपालावर्गीय पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले.

परिसरात गेल्या दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण होते. आज सायंकाळी 4.30 च्या सुमारास अचानक वादळी वार्‍यासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. या पावसामुळे ग्रामस्थांची तारांबळ उडाली. या पावसामुळे शेतातील उभी पीके गहू, हरभरा, बाजरी, ऊस, केळी, पपई, कांदा व इतर भाजीपालावर्गीय पिकांचे मोठया प्रमाणावर नुकसान झाले. शासनाच्या महसूल विभागाने शेतकर्‍यांच्या शेतात जाऊन त्वरित पंचनामे करावेत अशी मागणी भाजपाचे तालुकाध्यक्ष ईश्वर पाटील, तालुका उपाध्यक्ष संजय पाटील, तालुका सरचिटणीस विजय पाटील, भाजपा किसान आघाडीचे तालुका अध्यक्ष वासुदेव पाटील, सामाजिक कार्यकर्ते प्रवीण पाटील, पंकज पाटील, पंचायत समितीचे सभापती वीरसिंग ठाकरे यांनी केली आहे. याबाबत आदिवासी विकास मंत्री ना.डॉ.विजयकुमार गावित, खा.डॉ.हिना गावित, जि.प.अध्यक्षा डॉ.सुप्रिया गावित, आ.राजेश पाडवी यांना देणार असल्याचे संजय पाटील यांनी सांगितले.

प्रकाशा

प्रकाशा ता.शहादा येथे संध्याकाळी पाच वाजेच्या सुमारास वादळी वार्‍यासह तासभर धुव्वाधार पाऊस पडला. त्यामुळे रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले. शेतकरी हवालदिल झाला आहे. होळी वर बेमोसमी पावसाने विजरण घातले. दिवसभर ढगाळ वातावरण होते. अचानक आलेल्या पावसामुळे तारांबळ उडाली. पावसामुळे होळीच्या उत्साहावर विरजण पडले. गेल्या अनेक वर्षात प्रथमच होळीच्या दिवशी पाऊस पडल्याचे सांगण्यात येत आहे.

- Advertisment -

ताज्या बातम्या