Saturday, May 9, 2026
HomeनगरAhilyanagar : गुन्हेगारांच्या पध्दतींचा एकत्रित डेटा करण्यासाठी प्रयत्न करणार

Ahilyanagar : गुन्हेगारांच्या पध्दतींचा एकत्रित डेटा करण्यासाठी प्रयत्न करणार

वृंद परिषदेत पोलिसांच्या समस्यांवर तात्काळ उपाययोजनांचे निर्देश

अहिल्यानगर |प्रतिनिधी| Ahilyanagar

घरफोडीच्या गुन्ह्यांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत असून अनेक गुन्ह्यांमध्ये एकाच पध्दतीने गुन्हे केल्याचे निदर्शनास येत आहे. मात्र, सध्या गुन्हेगारांची ‘मोडस ऑपरेंडी’ (गुन्हा करण्याची पध्दत) ही माहिती ‘सीसीटीव्हीएनएस’ प्रणालीमध्ये विश्लेषणात्मक स्वरूपात एकत्रित उपलब्ध नाही. त्यामुळे तपासात अडचणी येतात, गुन्हेगारांची ‘मोडस ऑपरेंडी’ एकत्रित स्वरूपात ‘सीसीटीव्हीएनएस’ प्रणालीमध्ये समाविष्ट केल्यास तपास अधिक परिणामकारक होईल, असे मत पोलिसांनी मांडल्यानंतर राज्याचे अपर पोलीस महासंचालक (फोर्स वन) कृष्णप्रकाश यांनी याबाबत सकारात्मक भूमिका घेत माहिती एकत्र करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे स्पष्ट केले.

- Advertisement -

अपर पोलीस महासंचालक कृष्णप्रकाश हे जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासणीसाठी आले असता, पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर त्यांनी अधिकारी व कर्मचारी यांच्याशी ‘वृंद परिषदे’च्या माध्यमांतून थेट संवाद साधत त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. यावेळी पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे, अपर पोलीस अधीक्षक वैभव कलुबर्मे व सोमनाथ वाकचौरे यांच्यासह पोलीस अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. त्यांनी कामकाजात येणार्‍या अडचणी मांडल्या. शेवगावचे उपअधीक्षक राजगुरू यांनी राज्यातील घरफोडी गुन्ह्यांतील आरोपींच्या मोडस ऑपरेंडीची एकत्रित माहिती उपलब्ध नसल्यामुळे तपासात अडचणी येत असल्याचे निदर्शनास आणून दिले. यावरही तत्काळ पत्रव्यवहार करून ही समस्या सोडवण्याचे आश्वासन कृष्णप्रकाश यांनी दिले.

सायबर पोलीस ठाण्यामध्ये विविध मोबाईल कंपन्यांचा डेटा रिकव्हर करण्यासाठी आवश्यक असलेल्या लायसन्सची मुदत संपली असून ती तातडीने वाढवावी, तसेच स्थानिक गुन्हे शाखेसाठी स्वतंत्र लायसन्स द्यावे, अशी मागणी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांनी केली. यावर अपर पोलीस महासंचालकांनी तत्काळ पत्रव्यवहार करण्याचे आदेश दिले. 2010 साली भरती झालेल्या अनेक पोलीस कर्मचार्‍यांना अद्याप बढती मिळालेली नसताना, 2012 मध्ये भरती झालेल्या कर्मचार्‍यांना बढती मिळाल्याची तक्रार एका महिला पोलीस कर्मचार्‍याने मांडली. यावर सविस्तर चर्चा झाली असता, 2012 मधील शासन निर्णयामुळे अडचण निर्माण झाल्याचे स्पष्ट झाले. मात्र, 2010 मध्ये भरती झालेल्या कर्मचार्‍यांवर अन्याय होत असल्याचे मान्य करत कृष्णप्रकाश यांनी कायदेशीर उपाययोजनांबाबत सूचना केल्या.

बॉक्सिंग खेळाडूंसाठी थेट हस्तक्षेप
पोलीस दलातील बॉक्सिंग खेळाडूंना राज्य बॉक्सिंग असोसिएशनकडून विविध स्पर्धांमध्ये खेळण्यास मान्यता दिली जात नसल्याने गुणवान खेळाडूंवर अन्याय होत असल्याची तक्रार पोलीस कर्मचार्‍याने केली. यावर कृष्णप्रकाश यांनी थेट बॉक्सिंग असोसिएशनचे अध्यक्ष आमदार प्रवीण दरेकर यांना फोन करून चर्चा केली. आमदार दरेकर यांनी यावर सकारात्मक प्रतिसाद दिला.

ग्रामसुरक्षा दलासाठी निधीची मागणी
ग्रामीण भागात सुरू करण्यात आलेली ग्रामसुरक्षा दल योजना निधीअभावी बंद पडली असून, निधी उपलब्ध झाल्यास कायदा व सुव्यवस्थेला अधिक बळकटी मिळू शकते, अशी मागणी नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी केली. यावर कृष्णप्रकाश यांनी तात्काळ जिल्हाधिकारी यांना पत्रव्यवहार करण्याच्या सूचना दिल्या आहेत.

ताज्या बातम्या

मुंबई-पुणे महामार्गावर खासदार सुप्रिया सुळे यांच्या वाहनाचा अपघात; सर्वजण सुखरूप

0
मुंबई |खासदार सुप्रिया सुळे यांच्या गाडीचा मुंबई-पुणे महामार्गावर अपघात झाल्याची घटना समोर आली आहे. मागून भरधाव वेगाने आलेल्या एका कारने त्यांच्या वाहनाला धडक दिल्याची...