मुंबई । प्रतिनिधी Mumbai
राज्यातील विविध महानगरात वेगवेगळ्या परिवहन सेवा कार्यरत आहेत. या सर्व सेवा एकाच छताखाली आणल्या जाणार असून त्यासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी येथे दिली. एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरणासाठी कायदा तयार करण्याचे निर्देशही फडणवीस यांनी प्रशासनाला दिले.
मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज सह्याद्री अतिथीगृहात महानगर वाहतूक प्राधिकरणाच्या अनुषंगाने बैठक पार पडली. या बैठकीत बोलताना फडणवीस म्हणाले, राज्यात सध्या वेगवेगळ्या महानगरांमध्ये महापालिका, राज्य परिवहन महामंडळ, रेल्वे, मेट्रो आदी यंत्रणांच्या माध्यमातून परिवहन सेवा पुरविल्या जात आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी या सर्व परिवहन सेवांमध्ये सुसूत्रीकरण असणे गरजेचे आहे. महानगरांमधील परिवहन सेवेच्या विकास आणि विस्तारासाठी एकात्मिक महानगर वाहतूक प्राधिकरण स्थापन करावे. या प्राधिकरणाच्या माध्यमातून विविध परिवहन सेवांचे एकच भाडे, शहरांमध्ये सुरू असलेले परिवहन प्रकल्प आदींबाबत समन्वय साधणे सोयीचे होईल.
प्राधिकरणाच्या प्रभावी कामकाजासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतंत्र पद निर्माण करावे. मात्र, हा कायदा करताना सध्या परिवहन सेवांबाबतचे राज्याचे कायदे, नियम, केंद्र सरकारचे कायदे, विविध नियम यामध्ये अधिक्रमित होणार नाहीत याची काळजी घ्यावी. शहरातील परिवहनाचे प्रकल्प गतीने पूर्ण होण्यासाठी एकच नियामक यंत्रणा असावी. यासाठी हे प्राधिकरण महत्त्वाची भूमिका बजावणार आहे. नागरिकांना सुकर आणि सहज परिवहन सेवा उपलब्ध व्हावी यासाठी प्राधिकरणाचे काम करेल, असेही फडणवीस यांनी सांगितले.
या प्राधिकरणात सर्व महानगरपालिकांचे महापौर, आयुक्तांचा समावेश असावा. परिवहन सेवांची अंमलबजावणी संबंधित महापालिकडेच राहील. केवळ नियोजन, विकासाची बाब प्राधिकरणाकडे असेल. या प्राधिकरणांतर्गत कार्यकारी समिती असावी. शहरांमध्ये परिवहन सेवेचे विस्तार आणि नियोजन करताना भविष्यात प्राधिकरण राज्य सरकारसाठी सल्लागार म्हणूनही काम करेल, असेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.
या बैठकीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, परिवहन विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव संजय सेठी, ठाणे महानगरपालिका आयुक्त सौरभ राव, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचे अतिरिक्त आयुक्त अश्विन मुदगल, बेस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीनिवासन आदी उपस्थित होते.