.
अमेरिका आणि इराणमधील संघर्ष रविवारी आणखी तीव्र झाला असून दोन्ही देशांनी एकमेकांविरोधात मोठ्या लष्करी कारवाया केल्या आहेत. होर्मुझ सामुद्रधुनीत सायप्रसच्या ध्वजाखालील मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यानंतर अमेरिकेने इराणमधील लष्करी तळ, क्षेपणास्त्र प्रक्षेपण केंद्रे, ड्रोन सुविधा, नौदलाची ठिकाणे आणि दळणवळण यंत्रणांवर व्यापक हवाई हल्ले केले. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडने (CENTCOM) ही कारवाई राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. या मोहिमेत सुमारे १४० लष्करी लक्ष्यांवर मारा करण्यात आल्याचा दावा करण्यात आला आहे.
अमेरिकेच्या या कारवाईनंतर इराणनेही तातडीने प्रत्युत्तर देत कतार, बहरीन, कुवेत, जॉर्डन आणि ओमानमधील अमेरिकन लष्करी तळांना लक्ष्य करून क्षेपणास्त्र व ड्रोन हल्ले केल्याचा दावा केला. अनेक ठिकाणी हवाई हल्ल्याचे सायरन वाजले, तर हवाई संरक्षण यंत्रणा सक्रिय करण्यात आली. काही ठिकाणी क्षेपणास्त्रे हवेतच पाडण्यात आल्याचे वृत्त आहे.
दरम्यान, इराणने पुन्हा एकदा जगातील सर्वाधिक महत्त्वाच्या सागरी व्यापारी मार्गांपैकी एक असलेल्या होर्मुझ सामुद्रधुनी बंद केल्याची घोषणा केली आहे. या मार्गातून जगातील मोठ्या प्रमाणावर कच्चे तेल आणि नैसर्गिक वायूची वाहतूक होते. त्यामुळे जागतिक ऊर्जा पुरवठा आणि तेलाच्या किमतींवर परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र अमेरिकेने व्यापारी जहाजांची वाहतूक सुरू असल्याचा दावा करत परिस्थितीवर नौदलाचे नियंत्रण असल्याचे म्हटले आहे.
या संघर्षाची ठिणगी होर्मुझ सामुद्रधुनीत मालवाहू जहाजावर झालेल्या हल्ल्यामुळे पडली. या हल्ल्यात जहाजाच्या इंजिन विभागाला मोठे नुकसान झाले असून जहाजाला आग लागली. एका नागरी कर्मचाऱ्याचा बेपत्ता असल्याचे वृत्त आहे. या घटनेनंतर अमेरिकेने इराणविरोधात तिसऱ्या टप्प्यातील हवाई कारवाई सुरू केली.
संघर्ष वाढत असल्याने आखाती देशांमध्ये सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. तसेच युद्धाचा विस्तार होऊ नये म्हणून अनेक देशांकडून राजनैतिक प्रयत्न सुरू आहेत. मात्र दोन्ही बाजूंनी आक्रमक भूमिका कायम असल्याने मध्यपूर्वेतील परिस्थिती अत्यंत तणावपूर्ण बनली असून जागतिक अर्थव्यवस्था, तेलबाजार आणि आंतरराष्ट्रीय व्यापारावर त्याचे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.




