दिल्ली । Delhi
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील तणाव दिवसेंदिवस गंभीर होत आहे. दहशतवाद्यांविरोधातील भारताच्या कारवाईला आंतरराष्ट्रीय स्तरावर व्यापक पाठिंबा मिळतो आहे. रशिया आणि जपानने उघडपणे भारताच्या भूमिकेचं समर्थन केलं आहे. तर चीन आणि तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने उभं राहिलं आहे. विशेष म्हणजे, अमेरिका देखील भारताच्या बाजूने असल्याचं जाहीर करत असून, आता मध्यस्थीची भूमिका घेण्यास तयार असल्याचं संकेत दिले आहेत.
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावात आम्ही सहभागी नाही, अशी ठाम भूमिका मांडणाऱ्या अमेरिकेने आता 24 तासांत भूमिका बदलली आहे. अमेरिकेचे परराष्ट्रमंत्री मार्को रुबिया यांनी भारत आणि पाकिस्तानमध्ये चर्चा घडवून आणण्यासाठी मदतीचा प्रस्ताव दिला आहे. मार्को रुबिया यांनी म्हटलं की, “दोन्ही देशांनी तणाव कमी करावा. आम्ही चर्चेसाठी सर्वतोपरी मदत करू. शेजारी देशांमध्ये शांतता राखणं आवश्यक आहे.” त्यांनी पाकिस्तानचे लष्करप्रमुख यांना फोन करून या संदर्भात महत्त्वपूर्ण चर्चा केली. या चर्चेत संभाव्य युद्धजन्य परिस्थिती टाळण्यावर भर देण्यात आला.
अमेरिकेचे उपाध्यक्ष जे.डी. वॅन्स यांनी या परिस्थितीवर भिन्न मत मांडलं होतं. “भारत-पाकिस्तानमधील हा अंतर्गत प्रश्न आहे. यामध्ये आम्ही हस्तक्षेप करणार नाही,” असं वॅन्स यांनी स्पष्ट केलं होतं. त्यांनी अणूयुद्ध होणार नाही, यावरही विश्वास व्यक्त केला होता. फॉक्स न्यूजला दिलेल्या मुलाखतीत वॅन्स म्हणाले, “आमचं काम फक्त दोन्ही देशांना शांतता राखण्याचं आवाहन करणं आहे. आम्ही युद्धात सहभागी होणार नाही. हे आमचं युद्ध नाही आणि यामध्ये आम्हाला सामील व्हायचं नाही.”
अमेरिकेच्या या दोन्ही नेत्यांच्या विधानांमध्ये स्पष्ट परस्परविरोध दिसून येतो. एकीकडे वॅन्स यांनी अलिप्त राहण्याची भूमिका घेतली, तर दुसरीकडे परराष्ट्रमंत्री रुबिया यांनी सक्रिय हस्तक्षेपाचा प्रस्ताव मांडला. त्यामुळे अमेरिका नेमकी कुठल्या बाजूने आहे, हा प्रश्न उपस्थित झाला आहे. दरम्यान, भारताच्या दहशतवादाविरोधातील भूमिकेला रशिया आणि जपानसारख्या देशांचा ठाम पाठिंबा मिळतो आहे. अमेरिका देखील सुरुवातीला नकारात्मक भूमिका घेत असूनही आता भारताच्या बाजूने उभं राहत असल्याचं दिसतं आहे. दुसरीकडे, चीन आणि तुर्कीने पाकिस्तानच्या बाजूने पाठिंबा दिला असून, त्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर सामरिक स्थिती अधिक गुंतागुंतीची होत चालली आहे.
भारत आणि पाकिस्तानमधील तणाव गंभीर स्थितीकडे वाटचाल करत आहे. जागतिक समुदायातील प्रमुख देश यावर आपली भूमिका घेऊ लागले आहेत. अमेरिकेच्या भूमिकेतील अचानक झालेला बदल हे याचेच उदाहरण आहे. आता या तणावाच्या पार्श्वभूमीवर दोन्ही देश चर्चा करतात का, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.