नवी दिल्ली वृत्तसंस्था | New Delhi
अमेरिकेच्या वॉशिंग्टन डीसीमधील ‘व्हाईट हाऊस’जवळ तैनात असलेल्या नॅशनल गार्ड्सवर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली ज्यानंतर एकच खळबळ माजली. या गोळीबारात दोन नॅशनल गार्ड्स गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. आता यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी संतप्त प्रतिक्रिया देताना गंभीर इशारा दिला.
ट्रम्प काय म्हणाले?
“एका प्राण्याने आपल्या दोन नॅशनल गार्डवर गोळीबार केला. या घटनेत दोन्ही गार्ड गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शिवाय, हल्लेखोरही जखमी असून त्याला मोठी किंमत मोजावी लागेल. आपले दोन्ही गार्ड लवकरात लवकर बरे व्हावेत, अशी मी प्रार्थना करतो. हे खरोखरच महान लोक आहेत. मी, युनायटेड स्टेट्सचा अध्यक्ष म्हणून आणि प्रेसिडेंसी कार्यालयाशी संबंधित प्रत्येकजण तुमच्यासोबत उभा आहे.”
माहितीनुसार, हा गोळीबार नॅशनल गार्ड्सच्या सदस्यांना लक्ष्य करून करण्यात आला होता. या घटनेनंतर ट्रम्प यांनी प्रतिक्रिया देताना गंभीर इशारा देत आपण या हल्लेखोरांना सोडणार नाही, असे म्हटले आहे. या गोळीबारानंतर काही वेळातच एका संशयिताला ताब्यात घेण्यात आले आहे. या संदर्भात व्हाईट हाऊसकडून स्पष्टीकरण देण्यात आले आहे.
ट्रम्प यांनी एका भाषणात बोलताना या गोळीबाराच्या घटनेचा निषेध करत हा घृणास्पद हल्ला असून हे दहशतवादी कृत्य असल्याचे म्हटले आहे. तसेच ट्रम्प यांनी हे देखील स्पष्ट केले की, अमेरिकन अधिकाऱ्यांच्या मते हा गोळीबार करणारा अफगाणिस्तानचा नागरिक असून तो २०२१ मध्ये अमेरिकेत आला होता.
त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल
व्हाईट हाऊसजवळील नॅशनल गार्ड्सवर झालेल्या गोळीबाराच्या घटनेनंतर ट्रुथ सोशलवर पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं की, “ज्याने हा गुन्हा केला, त्याला दुखापत झाली आहे. पण त्याला खूप मोठी किंमत मोजावी लागेल. दोन नॅशनल गार्ड्सना गोळी मारणारा व्यक्ती आणि गार्ड्स हे गंभीर जखमी झाले आहेत. आता दोन वेगवेगळ्या रुग्णालयात आहेत. पण हल्लेखोराला किंमत मोजावी लागेल”, असे डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटले आहे.
देशदूतच्या व्हाट्सॲप ग्रुपला जॉईन होण्यासाठी लिंकवर क्लिक करा




